पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ जून रोजी सणस मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा पुण्यात पहिल्यांदाच होणार आहे. देशातून तसेच परदेशातून स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. यावर्षी ५ ते ७ आॅक्टोबर दरम्यान दक्षिण अफ्रिकेतील केपटाउन येथे होणाºया दुसºया जागतिक लेझर रन अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार आहे, अशी माहिती मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी दिली.
यावेळी मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपत्रे, मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष बिपीन सुर्यवंशी, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे क्रीडा संचालक विनय मराठे, प्रशिक्षक जितेंद्र खासनीस, सिस्मा स्पोर्टसच्या व्यवस्थापिका जानकी देसाई आदी उपस्थित होते.
नामदेव शिरगावकर म्हणाले, २०१५ पासून लेझर-रन स्पर्धेला सुरुवात झाली. मॉडर्न पेंटॅथलॉनमधील या प्रकारात धावणे आणि नेमबाजीची स्पर्धा होते. पुण्यात प्रथमच होणाºया आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे व्यवस्थापन सिस्मा स्पोर्टस् करीत आहे. या स्पर्धेत ११ वर्षांखालील ते ६० वर्षांवरील खेळाडू सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा पुरुष, महिला आणि मुले-मुली अशा गटात होणार आहे.
मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे क्रीडा संचालक विनय मराठे म्हणाले, स्पर्धेतील ११ वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे आणि ५ मीटर अंतरावरून नेमबाजी करणे, १३ वर्षांखालील गटात १२०० मीटर धावणे आणि ५ मीटर वरून नेमबाजी, १५ वर्षांखालील गटात १६०० मीटर धावणे आणि ७ मीटर वरून नेमबाजी, १७ वर्षांखालील गटात १६०० मीटर धावणे आणि १० मीटर वरून नेमबाजी, १९, २१ व ३९ वर्षांखालील गटात ३२०० मीटर धावणे आणि १० मीटर वरून नेमबाजी, मास्टर्स गटात (४० ते ४९ वर्षांखालील) १६०० मीटर धावणे आणि १० मीटरवरून नेमबाजी, ५९ वर्षांखालील गटात १२०० मीटर धावणे व ७ मीटर वरून नेमबाजी, ६० वर्षांवरील गटात १२०० मीटर धावणे आणि ७ मीटर वरून नेमबाजी करावी लागणार आहे.
स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक स्पर्धकाला पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक गटातील पहिल्या सहा विजेत्यांना रोख पारितोषिक आणि करंडक देण्यात येणार आहे. यापूर्वी हरयाणा येथील कर्नाळ येथे ही स्पर्धा झाली असून त्यानंतर स्पर्धा पुण्यात होत आहे.
सिस्मा स्पोर्टसच्या व्यवस्थापिका जानकी देसाई म्हणाल्या, कोणत्याही खेळाडूची गैरसोय होऊ नये यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने वेळेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. साधारण ५०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी www.cismasports.com या संकेतस्थळावरून नोंदणी करावी. स्पर्धकांना केवळ संकेतस्थळावरुनच नावनोंदणी करता येणार आहे. शनिवार दिनांक १० जून पर्यंत स्पर्धकांना नावनोंदणी करता येईल. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ९६८९८९३७१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. पुण्यात प्रथमच होणाºया या स्पर्धेत पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.