भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाने ८ गडी राखून पराभूत केले. मात्र या सामन्यानंतर विराट कोहली अपत्यजन्मासाठी मायदेशी परतल्याने उर्वरित कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यांच्या पूर्वसंध्येला आभासी पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्ट्रेलियन संघाच्या माईंडगेम कडे आम्ही लक्ष देत नाही, असे वक्तव्य रहाणेने केले.
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने भारताला डिवचले
मेलबर्न यथील कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगर यांनी भारतीय संघ दबावात असेल, तर मला आनंदच होईल, असे विधान केले होते. तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेवर अधिक दबाव टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू, असा इशाराही लँगर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना रहाणे म्हणाला, “ऑस्ट्रेलिया असे मानसिक खेळ खेळण्यात निष्णात आहे. त्यामुळे त्यांना ते खेळू द्या. आम्ही आमच्या कामगिरीवर लक्ष देत आहोत आणि आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्याकडे आमचा कल आहे.”
“कर्णधारपदाचा दबाव नाही”
कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना रहाणे म्हणाला, “भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे तसेच महत्वाची जबाबदारी देखील. मात्र याचा माझ्यावर कुठलाही दबाव नाही. आत्ता माझे काम संघाचे साथ देणे, हे आहे. आणि मी संघाकडेच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. सांघिक कामगिरी हीच आत्ता आमची प्राथमिकता आहे.”
“सलामीवीरांना नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य”
युवा शुबमन गिलच्या पदार्पणाबद्दलही रहाणेने आपले मत व्यक्त केले. “पदार्पण करत असलेला शुबमन तसेच युवा फलंदाज मयंक अगरवाल यांच्यावर आम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू इच्छित नाही. सलामी फलंदाजांची भूमिका अतिशय महत्वाची असते. मात्र आम्ही त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी डावाची चांगली सुरुवात करून दिली तर येणाऱ्या फलंदाजांना डाव फुलविणे, सोप्पे होते.”
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीची प्लेईंग इलेव्हन भारताने एक दिवस आधीच जाहीर केली आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी एकूण चार बदल केले आहेत. शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना पदार्पणाची संधी मिळाली असून रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.
संबधित बातम्या:
– भारतीय संघ दबावात असल्याचे स्पष्ट; दुसर्या कसोटीच्या संघनिवडीवर माजी फलंदाजाची प्रतिक्रिया
– मला माझ्या फलंदाजी क्रमाबाबत लवचीकता ठेवायचीय, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वक्तव्य
– मायदेशी परतण्यापूर्वी कोहलीने हा संदेश देत वाढवले संघाचे मनोबल; अजिंक्य रहाणेने केला उलगडा