मुंबई । शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात सचिन गायकवाड आणि सौरभ रवालिया यांच्या नाबाद पाऊण शतकी भागीच्या बळावर बलाढ्य पश्चिम विभागाने मध्य विभागाचा 8 विकेटनी पराभव करीत आठव्या एलआयसी चषक आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
आता जेतेपदासाठी उत्तर विभागाचा सहज पराभव करणाऱया दक्षिण विभागाशी पश्चिम विभागाची गाठ पडेल.
नॅशनल क्रिकेट क्लबवर सुरू असलेल्या सामन्यात यजमान पश्चिम विभागाने आपल्या दणदणीत विजयांची मालिका आजही कायम ठेवली. 15 षटकांच्या या सामन्यात पश्चिम विभागाने मध्य विभागाला 6 बाद 122 अशीच मजल मारू दिली.
त्यांच्या रोहन वाघेला आणि जगदीश ममुडा यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपत मध्य विभागाचा डाव 122 धावांच्या पुढे जाऊच दिला. या धावांचा पाठलाग करताना पश्चिम विभागाचे पन्नाशीतच दोन फलंदाज बाद झाले.
मात्र त्यानंतर सचिन गायकवाड आणि सौरभ रवालिया यांनी सहजपणे 75 धावांची नाबाद भागी करत संघाच्या विजयावर 3 चेंडू राखून शिक्कामोर्तब केले. सचिनने 3 षटकार खेचत नाबाद 54 धावा वसूल केल्या तर सौरभने 27 धावांची खेळी केली. या विजयासह त्यांनी अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
साखळीतील शेवटच्या सामन्यात दक्षिण विभागाने नरेंदरच्या 60 चेंडूंतील 99 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 165 अशी दमदार मजल मारली. नरेंदरने या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकारांचा वर्षाव केला.
शतकाला अवघी एक धाव हवी असताना तो दिनेशच्या चेंडूवर हाशिमच्या हातात झेल देऊन बसला. त्यांच्या डावात सुगणेशनेही 27 धावांची महत्वाची खेळी साकारली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करतना उत्तर विभागानेही अंशुलच्या तडाखेबंद 54 धावांमुळे सामन्यात रंजकता आणली होती.
मात्र त्यांचा संघ 148 धावांपर्यंतच पोहचू शकला आणि दक्षिण विभगाने तिसऱया विजयासह आपलाही अंतिम फेरीचा प्रवेश निश्चित केला. आता स्पर्धेत तीन विजयांची नोंद करणारे दोन्ही बलाढ्य संघ जेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील.