---Advertisement---

मेस्सी दुखापतग्रस्त…तरीही हार मानली नाही! अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा जिंकला कोपा अमेरिकाचा खिताब

---Advertisement---

लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं रोमहर्षक लढतीत कोलंबियाचा 1-0 असा पराभव करून विक्रमी 16व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. उभय संघातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर, बदली खेळाडू लॉटारो मार्टिनेझनं अतिरिक्त वेळेत गोल करत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या मार्टिनेझनं 112व्या मिनिटाला जिओवानी लो केल्सोच्या पासवर गोल केला. मार्टिनेझचा हा स्पर्धेतील पाचवा गोल होता. यासह त्यानं ‘गोल्डन बूट’ जिंकला. अर्जेंटिनाचं हे सलग तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. यापूर्वी संघानं 2021 कोपा अमेरिका आणि 2022 फिफा विश्वचषक जिंकला होता.

अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. मेस्सीला सामन्याच्या 64व्या मिनिटाला दुखापत झाली. स्पर्धेत मेस्सी सतत पायाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता आणि त्याला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. याच कारणामुळे तो ग्रुप स्टेजचा शेवटचा सामनाही खेळला नव्हता. मात्र, मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला आणखी एक मोठं विजेतेपद मिळवण्यात यश आलं आहे.

या विजयासह अर्जेंटिनानं कोलंबियाची सलग 28 सामन्यांची विजयी मोहीमही थांबवली. कोलंबियाचा संघ फेब्रुवारी 2022 पासून अपराजित होता. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत अर्जेंटिनाचा कोलंबियावर वरचष्मा होता, जो विजेतेपदाच्या सामन्यातही कायम राहिला. दोन्ही संघ 44व्यांदा आमनेसामने आले होते. अर्जेंटिनानं कोलंबियाविरुद्धचा 27 सामने जिंकले आहेत. तर कोलंबियाला केवळ 9 वेळा अर्जेंटिनावर मात करता आली आहे. दोन्ही संघांमधील 8 सामने अनिर्णित राहिले.

तत्पूर्वी, अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया यांच्यातील अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमबाहेर मोठा गदारोळ झाला होता. हजारो चाहत्यांनी तिकीट न घेता जबरदस्तीनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, यामुळे सामना सुमारे 1 तास 20 मिनिटं उशिराने सुरू झाला. चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना दरवाजे बंद करावे लागले. वृत्तानुसार, अनेकांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं आणि काही खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, गोंधळामुळे त्यांचे कुटुंबीयही मैदानात जाऊ शकले नाहीत.

स्पेन विक्रमी चौथ्यांदा युरो चॅम्पियन! इंग्लंडचा सलग दुसऱ्या फायनलमध्ये पराभव
विम्बल्डनमध्ये कार्लोस अल्कारेजचं तुफान! दिग्गज नोव्हाक जोकोविचचं स्वप्न पुन्हा भंगलं
युवा ब्रिगेडचा दरारा! शुबमन गिलच्या संघानं झिम्बाब्वेला नाचवलं, मालिका 4-1 ने खिशात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---