अनेक फुटबॉल जाणकार लिओनल मेस्सीला आजवरचा जगतातील सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटू मानतात. पाच वेळेस ‘बॅलेन डी ओर’ पुरस्काराचा विजेता, २०१४ विश्वचषकातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूला मिळणारा गोल्डन बॉल पुरस्काराचा विजेता आणि अनेक मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा मेस्सी आणि रिअल माद्रिदचा सुपरस्टार स्ट्रायकर ४ ‘बॅलन डी ओर’ पुरस्काराचा विजेता क्रिस्तीआनो रोनाल्डो यामध्ये कोण सर्वोत्कृष्ठ खेळाडू आहे हा प्रश्न सध्या कटप्पाने बाहुबलीला का मारले या पेक्षाही मोठा झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी बार्सेलोना संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी पोर्तुगीज क्लब स्पोर्टींग लिसबन संघाच्या घरच्या मैदानावर अवतरला होता. हा सामना बार्सेलोना संघाने १-० असा जिंकला. या सामन्यात एक गोष्ट घडली जी मेस्सी आणि त्याच्या महानतेला सिद्ध करणारी होती.
या सामन्यात एक तरुण मुलगा सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन मैदानात धावत आला तो थेट लियोनल मेस्सीकडे. तो आला आणि त्याने मेस्सीला गळाभेट दिली. त्यावेळी मेस्सीने आदराने त्या प्रशंसकांची गळाभेट स्वीकारली. काही सेकंद तो त्याच्याशी बोलला. त्यानंतर जेव्हा सुरक्षा रक्षक त्या तरुण प्रशंसकाला घेऊन जायला आला. त्यावेळी त्या तरुण प्रशंसकाने मेस्सीच्या डाव्या पायाच्या शूजचे चुंबन घेतले आणि तो निघून गेला.
मेस्सी हा लेफ्ट फुटी (डाव्या पायाचा प्रामुख्याने वापर करणारा) खेळाडू आहे. त्याच्या जादुई खेळाचे खूप दिवाने आहेत. त्याच्या आजवरचा जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू असण्याच्या मताला अनेक जण विरोध करतील पण परंतु जर फक्त लेफ्ट फुटी सर्वोत्कृष्ठ खेळाडू कोण म्हणाल तर तेही निर्विवादपणे मेस्सीचे नाव घेतील.
मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात कोण श्रेष्ठ याचे वाद चालू आहेत. परंतु क्रिस्तीआनो रोनाल्डो आणि स्पोर्टींग लिसबोन संघाचे खूप घनिष्ट नाते आहे. या संघासाठी खेळताना रोनाल्डोने आपल्या व्यावसायिक फुटबॉलची सुरुवात केली आणि येथेच खेळताना तो प्रथम प्रकाशझोतात आला. रोनाल्डोच्या घरच्या मैदानावर जेथून त्याने सुरुवात केली आणि प्रसिद्धी मिळवली तेथील प्रेक्षक जर मेस्सीचे या प्रकारे दिवाने असतील तर महानतेच्या वादात मेस्सी अनेक पटीने पुढे आहे हे तर सिद्धच होते. त्याच बरोबर या घटनेला दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण सीमाउल्लंघन देखील म्हणू शकतो.
यदाकदाचित आपणाला माहिती नसेल तर-
# मेस्सीला अश्या घटनेचा हा पहिलाच अनुभव नव्हता. याच पद्धतीचा प्रकार मागील वर्षी अर्जेन्टिना वि. युरुग्वे या सामन्यात आला होता. युरुग्वेला अर्जेन्टिनाने १-० असे हरवले होते. त्यसामन्यात देखील युरुग्वे येथील घरचा प्रशंसक मैदानात आला आणि त्याने मेस्सीच्या डाव्या शूजचे चुंबन घेतले होते.
# या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ सप्टेंबर २०१७ रोजी देखील मेस्सीने एका चिमुकल्या चाहत्याला भेटून त्याचे पत्र स्वीकारले होते आणि त्याचे स्वप्न पूर्ण केले होते.