सोमवारी (3 जुलै) देशभरात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वजण या दिवशी आपल्या गुरूंचे ऋण व्यक्त करत असतात. हेच औचित्य साधून आपण आतापर्यंत भारतीय संघाला जे गुरु म्हणजेच प्रशिक्षक लाभले त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकांना मोठी जबाबदारी दिली जाते. संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय तसेच खराब कामगिरीचे खापर प्रशिक्षकांवर फोडले जाते. भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपद हे 1992 मध्ये पहिल्यांदा एका खास व्यक्तीकडे देण्यात आले. तत्पूर्वी 1971 पासून भारतीय संघासोबत एक माजी खेळाडू मॅनेजर म्हणून विदेश दौऱ्यावर जात असत. केकी तारापोर हे 1971 मध्ये भारतीय संघाचे पहिले मॅनेजर होते. त्यानंतर हेमू अधिकारी, सलीम दुरानी, दत्ता गायकवाड, गुलाब रायचंद, चंदू बोर्डे, बिशनसिंग बेदी, अशोक मंकड व अब्बास अली बेग इत्यादी दिग्गजांनी ही जबाबदारी निभावली.
सन 1992 पासून खऱ्या अर्थाने मुख्य प्रशिक्षक हे पद भारतीय क्रिकेटमध्ये तयार झाले. भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी तब्बल चार वर्ष ही जबाबदारी निभावली. 1996-1997 अशा वर्षभराच्या कालावधीत संदीप पाटील व मदनलाल यांच्याकडे हे पद दिले गेलेले. 1997 ते 1999 या कालावधीत अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले. त्यानंतर वर्षभर भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे मुख्य प्रशिक्षक होते.
मॅच फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेटची नाचक्की झाल्याने 2000 मध्ये भारताला पहिले विदेशी प्रशिक्षक मिळाले. न्यूझीलंडचे माजी कर्णधार जॉन राईट यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली. 2000 ते 2005 या प्रदीर्घ कालावधीत ते प्रशिक्षक राहिले. त्यांनीच भारतीय संघाला विजयाची सवय लावली असे अनेक माजी क्रिकेटपटू कबूल करतात.
राईट यांच्यानंतर दोन वर्ष ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपल हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. भारतीय क्रिकेटमधील सर्वात खराब कार्यकाळ म्हणून त्यांच्या कार्यकाळाकडे पाहिले जाते. त्यानंतर नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत रवी शास्त्री व चंदू बोर्डे यांनी भारतीय संघासह काम केले. 2007 ते 2008 या वर्षभराच्या कालावधीत भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी भारतीय संघाला सेवा दिली. त्यांच्याच मार्गदर्शनात भारताने टी20 विश्वचषक आपल्या नावे केला.
त्यानंतर 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कस्टर्न हे भारताचे मुख्य प्रशिक्षक बनले. 2011 वनडे विश्वचषक भारतीय संघाला जिंकून दिल्यानंतर त्यांनी आपले हे पद सोडले. पुढील चार वर्ष डंकन फ्लेचर हे भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्याच मार्गदर्शनात भारताने अखेरच्या वेळी 2013 चॅम्पियन ट्रॉफीच्या रूपाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्यानंतर रवी शास्त्री हे मॅनेजर म्हणून संघासोबत जोडले गेले. 2016 ते 2017 या वर्षभराच्या कालावधीत अनिल कुंबळे यांनी देखील हे पद निभावले.
कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री हे त्याच वर्षी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले. 2021 पर्यंत ते या पदावर काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने विदेशात अनेक कसोटी मालिका जिंकल्या. 2021 टी20 विश्वचषकानंतर त्यांनी आपले पद रिकामे केले. त्यानंतर आता त्यांच्या जागी राहुल द्रविड हे भारतीय संघाची धुरा वाहत आहेत.
(List Of All Indian Cricket Team Head Coach Greg Chappell Gary Kirsten Ravi Shastri Rahul Dravid Leads)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ ऍशेसमधून बाहेर! 12 वर्षानंतर प्रथमच नाही घालणार बॅगी ग्रीन
लॉर्ड्सवर बेन ब्लास्ट! संघ पराभूत झाला तरी स्टोक्सने मोडला 24 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड