प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की तो जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाईल, तेव्हा तो एकदातरी विश्वचषकात खेळेल. विश्वचषकात खेळणारा खेळाडू स्टार बनतो. परंंतु काही खेळाडू असेही होऊन गेले ज्यांनी विश्वचषकात चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतर भारतीय किंवा संघात त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले.
तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल ज्यांनी विश्वचषकात चांगली कामगिरी तर केली. परंतु पुढे जाऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला- List of Cricketers who played World Cup but Failed After that
६. गॅरी गिल्मोर-
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर (Gary Gilmour) यांनी १९७५ चा विश्वचषक खेळला होता. त्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यापर्यंत त्यांनी कोणताही सामना खेळला नाही. परंतु उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलिया संघात सामील करण्यात आले आणि त्यांनी इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली. गिल्मोर यांनी उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध केवळ १४ धावा देत सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यात मदत मिळाली. तरीही अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. परंतु गिल्मोर यांंनी अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या.
आपल्या फीटनेसच्या कारणामुळे विश्वचषकानंतर गिल्मोर यांनी केवळ १ वनडे सामनाच खेळला. गिल्मोर यांनी आपल्या वनडे कारकीर्दीत केवळ ५ सामनेच खेळले. तसं त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाकडून १५ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ५४ विकेट्स घेतल्या. गिल्मोर यांना स्विंग गोलंदाजीचा ‘जादूगार’ म्हटले जात होते.
५. पीटर कर्स्टन-
दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज पीटर कर्स्टन (Peter Kirsten) यांनी १९९२च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक खेळत होता. यामध्ये पीटर यांनी ६८.३०च्या सरासरीने ४१० धावा केल्या होत्या. त्यात ४ अर्धशतकांचा समावेश होता. या विश्वचषकात पीटर हे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांंकावर होते. त्यावेळी पीटर यांचे वय केवळ ३७ होते. त्यामुळेच विश्वचषकानंतर त्यांना अधिक काळ खेळता आले नाही.
पीटर यांनी दक्षिण आफ्रिकेकडून १२ कसोटी आणि ४० वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ६२६ आणि वनडेत १२९३ धावा केल्या आहेत. १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे पीटर यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९९४मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
४. अँडी बिकेल-
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अँडी बिकेलने (Andy Bichel) २००३ च्या विश्वचषकात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. यादरम्यान बिकेलने ८ सामन्यांमध्ये खेळताना १६ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात तब्बल ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. परंतु त्याला आपला हाच फॉर्म पुढे तसाच ठेवता आला नाही. त्यामुळे त्याची कारकीर्दही लवकर संपुष्टात आली.
३. नील जॉनसन-
झिंबाब्वे संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू नील जॉनसन (Neil Johnson) यांनी १९९९ विश्वचषकात चांगलेच चर्चेत राहिले होते. त्यांनी १९९९ च्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करत ३ वेळा सामनावीर पुरस्कार मिळविला होता. जॉनसन यांनी आपल्या कामगिरीच्या दमावर झिंबाब्वे संघाला अव्वल सहा संघांमध्ये स्थान मिळवून दिले होते. परंतु विश्वचषकानंतर जॉनसन अधिक काळ झिंबाब्वे संघाकडून खेळू शकले नाहीत. त्यांचे झिंबाब्वे बोर्डाबरोबर खूप वाद-विवाद झाले होते. वाद इतका वाढला की त्यांची कारकीर्द अधिक काळ टिकू शकली नाही. १९९९ विश्वचषकात जॉनसनने ५२.१४ च्या सरासरीने ३६७ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी या विश्वचषकात १२ विकेट्सही घेतल्या होत्या.
त्यांनी झिंबाब्वे संघाकडून आतापर्यंत १३ कसोटी सामने आणि ४८ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ५३२ आणि वनडेत १६७९ धावा केल्या आहेत.
२. मोहित शर्मा-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा (Mohit Sharma) २०१५ च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात खेळला होता. त्यात त्याने एकूण ८ सामने खेळताना १३ विकेट्स घेतल्या होत्या. त्या विश्वचषकात इशांत शर्मा खेळला नव्हता. त्यामुळे मोहितला संघात स्थान मिळाले होते. मोहितने या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतर भारताकडून चांगली कामगिरी करता आली नाही.
आपल्या कारकीर्दीत त्याने आतापर्यंत २६ वनडे सामने आणि ८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत ३१ तर टी२०त ६ विकेट्स घेतल्या आहेत.
१. ग्रांट इलियट-
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्रांट इलियटने (Grant Elliott) २०१५ च्या विश्वचषकात उत्तम कामगिरी केली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ७३ चेंडूत नाबाद ८४ धावा करत संघाला अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले होते. त्यात ३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. २०१५च्या विश्वचषकाच्या सुरुवातीला इलियट आपल्या बहिणीच्या लग्नसमारंभात व्यस्त असल्यामुळे संघाचा भाग नव्हता. बहिणीच्या लग्नानंतर तो पुन्हा संघात सामील झाला आणि त्याने उपांत्य सामन्यात खेळलेल्या खेळीमुळे चाहते त्याला आजही विसरलेले नाहीत. इलियटने डेल स्टेनच्या चेंडूवर षटकार लावत संघाला विजय मिळवून दिला होता.
त्याने विश्वचषकात उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यामुळे असे वाटत होते की, न्यूझीलंडकडून आणखी सामने खेळले. परंतु असे झाले नाही. इलियटने आपल्या वनडे कारकीर्दीत केवळ ५ कसोटी सामने, ८३ वनडे सामने आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८६, वनडेत १९७६ आणि टी२०त १७१ धावा केल्या आहेत. त्याने न्यूझीलंडकडून २०१६च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता.




