टी20 विश्वचषक 2024 चा 39वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला गेला. हे दोन्ही संघ सुपर 8 च्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत. या सामन्यात न्यूझीलंडनं पापुआ न्यू गिनीवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पीएनजीचा संघ 19.4 षटकांत 78 धावांवर ऑलआऊट झाला होता. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडनं 79 धावांंचं लक्ष्य 12.2 षटकांच 3 गडी गमावून गाठलं.
या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याची. त्यानं शानदार गोलंदाजी करत आपले चारही ओव्हर मेडन टाकले! अशाप्रकारे, लॉकी फर्ग्युसन टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या 4 षटकांच्या स्पेलमधील सर्व षटकं मेडन टाकणारा पहिला गोलंदाज बनला आहे.
याशिवाय एकूण टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज आहे. याआधी टी20 क्रिकेटमध्ये असं केवळ एकदा घडलं आहे. 2021 मध्ये कॅनडाच्या साद बिन जफर यानं पनामा विरुद्धच्या टी20 सामन्यात आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही रन दिला नव्हता.
33 वर्षीय लॉकी फर्ग्युसननं या सामन्यात एकूण 3 बळी घेतले. त्यानं पहिल्याच चेंडूवर पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वाला याला 6 धावांच्या स्कोरवर बाद केलं. यानंतर त्यानं एकाही फलंदाजाला धावा बनवू न देता पॉवरप्लेमध्ये पहिला मेडन ओव्हर टाकला.
पॉवरप्ले संपल्यानंतर तो पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्यानं आणखी एक मेडन ओव्हर टाकला. 12व्या षटकात त्यानं 17 धावा करणाऱ्या चार्ल्स अमिनीची विकेट घेतली. यानंतर त्यानं 14व्या षटकात चॅड सोपरला बाद करत आपली तिसरी विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर! एकाच षटकात ठोकल्या 36 धावा, अनेक विक्रम मोडले
“तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका, भारतात परत या”, हरभजन सिंगचा पाकिस्तानी प्रशिक्षकाला सल्ला
आश्चर्यकारक! लाॅकी फर्ग्युसननं रचला इतिहास, टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू