टीम इंडियानं टी20 विश्वचषक 2024 जिंकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं शनिवारी, 29 जून रोजी बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयानंतर देशात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. टीम इंडियाच्या या विजयाचा आनंद संसदेतही साजरा करण्यात आला.
या विजयानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह संपूर्ण सभागृहानं रोहित आणि कंपनीचं अभिनंदन केलं. भारतीय संघाचं अभिनंदन करताना ओम बिर्ला म्हणाले, “भारतीय पुरुष क्रिकेट संघानं 29 जून 2024 रोजी बार्बाडोस, वेस्ट इंडिज येथे टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात यश मिळवलं हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला आहे. हा विजय निश्चितच सर्व तरुणांना आणि खेळाडूंना प्रेरणा देईल. मी माझ्या आणि संपूर्ण सभागृहाच्या वतीनं भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिकेट संघाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
Lok Sabha Speaker & the House congratulates Captain Rohit Sharma and the entire team for winning the T20I World Cup 🇮🇳
– THE HISTORY MAKERS…!!!! pic.twitter.com/EiWpKf13Gj
— Johns. (@CricCrazyJohns) July 1, 2024
टीम इंडियाचं राज्यसभेतही अभिनंदन करण्यात आलं. राज्यसभेत उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी टीम इंडियाचं अभिनंदन करताना, त्यांच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं सांगितलं. धनखर म्हणाले, “शनिवारचा दिवस भारताच्या इतिहासात गौरवशाली दिवस म्हणून नोंदवला गेला, जेव्हा भारतानं टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून दुसरं विश्वविजेतेपद पटकावले.”
जगदीप धनखर पुढे म्हणाले, “हा विजय खेळाडूंचं समर्पण, मेहनत आणि सांघिक कार्याचं फळ आहे. या विजयाचा भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिला विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता, पण भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी करून इतिहासात आपलं नाव कोरलं.”
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! जय शाह यांनी केली मोठी घोषणा
निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकचं पुनरागमन, आयपीएल 2025 साठी आरसीबीनं सोपवली मोठी जबाबदारी!
जिथे-तिथे फक्त ‘किंग’ कोहलीचीच हवा! वर्ल्डकपच्या एका पोस्टने मोडले सोशल मीडियाचे सर्व रेकाॅर्ड