क्रिकेट विश्वात अनेक विक्रम घडतात. त्यातील काही विक्रम हे कायम आठवणीत ठेवावे असे असतात, तर काही विक्रम हे वाईट स्वप्नासारखे असतात. त्यांना नकोसा किंवा लाजीरवाणा विक्रम म्हटले जाते. असाच एक नकोसा विक्रम भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाजाच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा नकोसा विक्रम भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात झाला.
शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात पहिला टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 176 धावा केल्या. भारताकडून या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला शुबमन गिल आणि ईशान किशन उतरले होते. मात्र, दोघांनाही खास कामगिरी करता आली नाही. किशन 4 धावांवरच तंबूत परतला. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) फलंदाजीला उतरला.
यावेळी भारतीय संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी राहुलवर होती. मात्र, तोदेखील अपयशी ठरला. त्याने यावेळी फलंदाजी करताना एकूण 6 चेंडू खेळून काढले. पण त्याला एकही धाव करता आली नाही. न्यूझीलंडकडून तिसरे षटक जेकब डफी (Jacob Duffy) टाकत होता. यावेळी राहुल त्याच्या गोलंदाजीवर धाव काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला ते जमलेच नाही. डफीने चौथ्या चेंडूवर राहुलला डेवॉन कॉनवेच्या हातून झेलबाद केले. यावेळी बाद होताच राहुलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळूनही शून्य धावेवर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुलच्याही नावाचा समावेश झाला. तो या सामन्यात 6 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, राहुल त्रिपाठी याने याबाबतीत केएल राहुल याची बरोबरी केली आहे. केएल राहुल याने 2021मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 6 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता.
विशेष म्हणजे, राहुल त्रिपाठीचा हा तिसरा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. यापूर्वी खेळलेल्या दोन्ही सामन्यात त्याने एकूण फक्त 40 धावा केल्या आहेत. (Longest duck by Indians in men’s T20Is)
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होणारे भारतीय खेळाडू
6 चेंडू- केएल राहुल, विरुद्ध- इंग्लंड (2021)
6 चेंडू- राहुल त्रिपाठी, विरुद्ध- न्यूझीलंड (2023)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! हवेत उडी मारून वॉशिंग्टनने घेतला ‘सुंदर’ कॅच; बीसीसीआयही म्हणाली, ‘व्वा काय झेल आहे’
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…