प्रो कबड्डी ५ मोसमातील चार नव्या संघांपैकी एक असणाऱ्या तमिल थलाइवाच्या जर्सीचे अनावरण काल चेन्नई येथे झाले. यावेळी संघमालक सचिन तेंडुलकर आणि संघाचे ब्रँड ऐम्बैसडर असणारे कमल हसन उपस्थित होते.
यावेळी तामिळ चित्रपट इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार अल्लू अर्जुन, राम चरण तेजा, फिल्म निर्माते अल्लू अरविंद आणि उद्योगपती निम्मागड्डा उपस्थित होते.
यावेळी सामाजिक संदेश देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, “जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही भारतात आहे. त्यात लठ्ठपणाचा विचार केला तर आपला जगात तिसरा क्रमांक लागतो. यामुळे हे प्रमाण चांगले नाही. ”
“त्यामुळे प्रत्येकाने कोणतातरी खेळ खेळावा. तो जरी व्यावसायिक नसेल तरी खेळावा. मी येथे फक्त कबड्डी खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो नसून मी भारतातील खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. ”
सचिन पुढे म्हणतो, “आपण जीवनात कधीतरी कबड्डी नक्की खेळलेलं असतो. मी पाठीमागे कबड्डीचे सामने पाहायला गेलो होतो. त्यावेळी मी जे काही वातावरण पहिले त्यामुळे मला पुन्हा या खेळाबद्दल प्रेम निर्माण झाले. ”
यावेळी सचिनने तमिल थलाइवाचे ब्रँड ऐम्बैसडर असणाऱ्या कमल हसन यांचे आभार मानले. या संघाचे सचिन बरोबर अल्लू अर्जुन, राम चरण तेजा, फिल्म निर्माते अल्लू अरविंद हे सहमालक आहेत.
प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमाला २८ जुलै पासून सुरुवात होत आहे.