केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२२मधील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. लखनऊने सोमवारी (०५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात १२ धावांनी सामना खिशात घातला. हा त्यांचा या हंगामातील सलग दुसरा विजय होता. हंगामातील पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र, सामना जिंकूनही राहुलने खंत व्यक्त केली आहे.
केएल राहुलने (KL Rahul) स्वीकारले की, पावरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावणे योग्य नाहीये. यावर संघाला काम करावे लागेल. राहुल म्हणाला की, “आम्ही स्वत:ला सामन्यात कायम ठेवून विजयाची संधी दिली. ही नक्कीच चांगली बाब आहे. मात्र, सुरुवातीला पावरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावणे चांगली बाब नाही. फलंदाजी गट म्हणून आम्हाला यावर काम करावे लागेल.”
राहुल म्हणाला की, “मागील तिन्ही सामन्यात गोलंदाजी चांगली राहिलीये.” आवेश खानने शानदार गोलंदाजी केली आणि विरोधी संघाच्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्याने सर्वाधिक ४ विकेट्स खिशात घातल्या. यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना आवेश म्हणाला की, “संघाला विकेट्स मिळवून देण्याचा माझा प्रयत्न होता. कारण संघाला हेच हवे असते. मला पावरप्ले आणि शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स घ्यायच्या आहेत. मला पावरप्लेमध्ये २ षटके मिळाली, ज्यामध्ये मी निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला.”
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार केन विलियम्सननेही (Kane Williamson) लखनऊच्या गोलंदाजांच्या कामगिरीची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “आमची कामगिरी मागील सामन्याच्या तुलनेत खूपच चांगली होती. पावरप्लेमध्ये गोलंदाजी चांगली राहिली, ज्यामध्ये ३ विकेट्स मिळाल्या. जर दीपक हुड्डा आणि केएल राहुलची भागीदारी तोडता आली असती, तर चांगले झाले असते. त्यामुळे ते १७०च्या धावसंख्येपर्यंत पोहोचले. लखनऊची गोलंदाजीही शानदार राहिली. आम्ही काही चांगली भागीदारी करू शकलो असतो, तर नक्कीच फरक पडला असता.”
या सामन्यात मिळवलेल्या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. ३ सामन्यांपैकी २ सामन्यातील विजयामुळे त्यांना ४ गुण मिळाले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा