प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना ‘झोन ए’ मधील दबंग दिल्ली आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाने त्यांचे मागील सामने जिंकले आहेत. हरयाणा संघाने मागील सामन्यात यु.पी.योद्धाला हरवले होते तर दबंग दिल्लीने तामिल थालयइवाज यांना ३०-२९ अशा एका गुणाच्या फरकाने हरवले होते.
हरयाणा संघ या मोसमातील सर्व सामन्यात अतिशय उत्तम खेळला आहे. या संघाने खेळलेल्या ५ सामन्यांपैकी फक्त १ सामना गमावला आहे. दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत तर दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. जो एक सामना या संघाने गमावला होता तो सामना फक्त एका गुणाने गमावला होता. जे दोन सामने या संघाने बरोबरीत सोडवले आहेत त्यात त्यांना विजयाची जास्त संधी होती पण रेडींगमधील अपयशामुळे ते सामने बरोबरीत सुटले.
या संघाची ताकद या संघाचा डिफेन्स आहे. कर्णधार सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर या जोडीने डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी केली आहे. सुरिंदर नाडा याने खेळलेल्या पाचही सामन्यात डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करताना ‘हाय ५’ मिळवला आहे. रेडींगमध्ये सर्वांच्या नजर असणार आहे गुणी खेळाडू विकास कांडोला आणि वजीर सिंग या खेळाडूंवर. विकास या मोसमात भलताच लयीत आहे. यांच्या रेडींगच्या जोरावरच हरयाणाने मागील सामना जिंकला होता. वजीर सिंग याने मागील काही सामन्यात चांगली कामगिरी केलेली नाही त्यामुळे त्याच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा असणार आहे.
दबंग दिल्ली झोन ए मधील गुणांचा विचार केला तर तळातला संघ आहे. या संघाने खेळल्या सहा सामन्यांपैकी चार सामने गमावले आहेत तर दोन सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. दबंग दिल्लीचा रेडींगमधील सर्व खेळ त्यांचा कर्णधार मेराज शेख याच्या अवतीभोवती फिरतो. डिफेन्समध्ये दिल्लीची मदार बाजीराव होडगे आणि निलेश शिंदे या खेळाडूंवर असणार आहे. मेराज याचा रेडींगमधील खेळ जर चांगला झाला नाही तर या संघाला रेडींगमध्ये गुण मिळवण्यातील मर्यादा उघड होतात.
या सामन्यात हरयाणा स्टीलर्सला विजयाची जास्त संधी आहे. या संघाचा डिफेन्स या स्पर्धेत खूप चांगल्या लयीत आहे. याचा या संघाला फायदा मिळतो आहे. दबंग दिल्ली संघाला जिकायचे असेल तर त्यांना खेळाच्या सर्व पातळ्यांवर उत्तम कामगिरी करावी लागेल.