आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळी भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु स्पर्धेत सर्वकाही उलटं झालं. विजेतेपद सोडा, भारतीय संघाला उपांत्यफेरी देखील गाठता आली नाही. सुपर -१२ मधून भारतीय संघाला माघारी परतावे लागले आहे. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरी नंतर अनेक दिग्गजांनी भारतीय खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच १९८३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या मदनलाल यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी म्हटले की, “खरं तर बायो बबलमुळे खेळाडू थकलेले आहेत. हा कुठलाही बहाणा नाहीये. भारत – न्यूझीलंड सामन्यात जेव्हा न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांविरुद्ध शॉट खेळत होते त्यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. परंतु जेव्हा भारतीय खेळाडू मारत होते, त्यावेळी चेंडू फक्त क्षेत्ररक्षकांकडे जात होता. ज्यावरून स्पष्ट होत होते की, भारतीय खेळाडू थकलेले आहेत यात काहीच शंका नाहीये. मात्र, खेळाडूंनी विश्वचषक की आयपीएल हे ठरवायला हवे.”
विश्रांती घेण्याची गरज..
तसेच ते पुढे म्हणाले की, “ते आयपीएल खेळून थेट टी२० विश्वचषक स्पर्धेत आले आहेत. यापूर्वी ते इंग्लंडमध्ये जाऊन आले होते. खरी समस्या ही आहे की, जर त्यांनी आयपीएल स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला असता, तर त्यांना विश्रांती करण्याची संधी मिळाली असती. माझ्या मते खेळाडूंना हे कळायला हवं की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. ही एक मालिका नसून विश्वचषक स्पर्धा आहे. याव्यतिरिक्त आपल्या सर्वांना माहीत आहे की, टी२० स्वरूप किती वेगळे आहे. या स्वरूपात दरवेळी चांगले प्रदर्शन करावे लागते. जसं की पाकिस्तान आणि इंग्लंड संघ करत आहे. खेळाडूंनी आयपीएल किती देश हे ठरवायला हवं.”
तसेच हार्दिक पंड्या बद्दल बोलताना ते म्हणाले की, “अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबतही काही गोष्टी स्पष्ट झाल्या नाहीत. तो फिट होता की नव्हता? तो गोलंदाजी करेल की नाही? यावरून संभ्रम निर्माण झाला होता.” रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याबाबत ते म्हणाले की, “ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला असेल तो चुकीचा निर्णय होता. रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना चांगली कामगिरी करत आहे. तर तुम्ही त्याला त्याच्या फलंदाजी क्रमावरून कसं काय हटवू शकता? त्यानंतर विराट कोहलीचे स्थान देखील बदलण्यात आले होते. खरं तर भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिली गेली पाहिजे होती.”