2024ची सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम टप्प्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात मध्य प्रदेशने दिल्लीचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेचा फायनल सामना रविवारी (15 डिसेंबर) रोजी मुंबई विरूद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) संघात होणार आहे. कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) मध्य प्रदेशला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. मध्य प्रदेशने 7 गडी राखून शानदार विजय मिळवला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 20 षटकात 146/5 धावा केल्या. यादरम्यान, अनुज रावतने (Anuj Rawat) संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 24 चेंडूत 33 धावा केल्या. दरम्यान त्याने 3 चौकारांसह 1 षटकार लगावला. तर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर अर्पित गौरच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर संघाला दुसरा धक्का सुभ्रांशू सेनापतीच्या रूपाने बसला. तो 7 धावा करून तंबूत परतला. यानंतर 46 धावांच्या स्कोअरवर 7व्या षटकात हर्ष गवळीच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. हर्षने 18 चेंडूत 30 धावा केल्या.
यानंतर कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar), हरप्रीत सिंग (Harpreet Singh) यांनी चौथ्या विकेटसाठी 106* (57 चेंडू) ची अखंड भागीदारी करत संघाला 15.4 षटकांत विजय मिळवून दिला. यादरम्यान पाटीदारने 29 चेंडूत 4 चौकारांसह 6 षटकारांच्या मदतीने 66* धावा ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानावर पुन्हा मॅच फिक्सिंग, संघ मालकाला झाली अटक!
“जसप्रीत बुमराहमध्ये अनेक दिग्गज गोलंदाजांचे मिश्रण…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
IND vs AUS; गाबा कसोटीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकाॅर्ड