रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२ अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने ६ विकेट्स राखून जिंकला. यासह मध्य प्रदेशने मुंबईचे ४२ वे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न मोडित काढत ८७ वर्षांत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मध्य प्रदेशला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात रजत पाटीदार याचा मोलाचा वाटा राहिला.
सरफराज खान आणि यशस्वी जयस्वालच्या खेळी व्यर्थ
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १२७.४ षटकात ३७४ धावा केल्या होत्या. या डावात मुंबईकडून सरफराज खानने शानदार शतकी खेळी केली होती. २४३ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने १३४ धावा केल्या होत्या. तसेच सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानेही १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७८ धावांचे योगदान दिले. याखेरीज कर्णधार पृथ्वी शॉ ४७ धावा जोडू शकला.
या डावात मध्य प्रदेशकडून गौरव यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने मुंबईच्या सर्वाधिक ४ फलंदाजांना बाद केले. तसेच अनुभव अगरवाल आणि सारांश जैन यांनीही प्रत्येकी ३ आणि २ विकेट्स काढल्या.
मध्य प्रदेशच्या ३ फलंदाजांची शतके
प्रत्युत्तरादाखल मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. मुंबईच्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशकडून त्यांच्या पहिल्या डावात ३ फलंदाजांनी शतके केली. सलामीवीर यश दुबे आणि शुभम शर्मा यांनी शतके करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. दुबेने १४ चौकारांच्या मदतीने १३३ धावा केल्या. तसेच शुभम शर्माने १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने ११६ धावांचे योगदान दिले.
सलामीवीरांच्या या जोडीनंतर रजत पाटीदारने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत २० चौकारांच्या मदतीने १२२ धावांची शानदार खेळी केली आणि संघाला मोठी आघाडी घेऊन देण्यात हातभार लावला. पहिल्या डावात मध्य प्रदेशने १६२ धावांची आघाडी घेतली.
मुंबईच्या संघाची घसरगुंडी अन् मध्य प्रदेशचा ऐतिहासिक विजय
मध्य प्रदेशच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात मुंबईचा मात्र घाम निघाला. सुवेद पारकरला वगळता मुंबईचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पारकरने ५१ धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त सरफराज खान (४५ धावा) आणि कर्णधार पृथ्वी शॉ (४४ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना साध्या ४० धावाही करता आल्या नाहीत. परिणामी मुंबईचा संघ दुसऱ्या डावात २६९ धावांवरच गारद झाला आणि मध्य प्रदेशला नाममात्र १०८ धावांचे आव्हान मिळाले.
मध्य प्रदेशने सहज हे लक्ष्य पार केले. मध्य प्रदेशकडून सलामीवीर हिमांशू मंत्रीने ३७ धावा केल्या. तसेच शुभम शर्मानेही ३० धावा केल्या. अखेर रजत पाटीदारने ३७ चेंडूत ३० धावांची झटपट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मनाचा किंग’ कोहली! विरोधी संघातील खेळाडूसाठी चाहत्यांशी भिडला विराट, व्हिडिओ होतोय व्हायरल
शुभमंगल सावधान! टी२० मालिकेपूर्वी आयर्लंडचा कर्णधार अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे खेळाडू
धोनी आणि केएल राहुलवर स्मृती मंधाना पडली भारी, टी२० क्रिकेटमध्ये पार केला मैलाचा दगड