पुणे २३ सप्टेंबर २०२३ – एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा करंडक सध्या भारताच्या विविध भागातून दौरा करत आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना त्याची झलक बघायला मिळत असून, मंगळवारी (ता. २६) पुणेकरांना हा करंडक बघण्याची संधी मिळणार आहे.
पुणेकरांना हा करंडक बघायला मिळावा यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भव्य रॅलीचे आयोजन केले असून, अशा पद्धतीने रॅली काढणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना देशातील पहिलीच संघटना ठरेल, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “केवळ अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच करंडकासोबत फोटो काढण्याची संधी मिळते असा समज आहे. पण, आम्ही सर्व क्रिकेट चाहत्यांना विश्वचषक करंडकासोबत फोटो काढण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत. क्रिकेट चाहते ही संधी चुकवणार नाहीत.”, असा विश्वासही रोहित पवार यांनी या वेळी व्यक्त केला.
या रॅलीचे मंगळवारी (ता. २६) आयोजन करण्यात आले आहे. सेनापती बापट मार्गावरील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलपासून दु. १२ वाजता या रॅलीची सुरुवात होईल. सेनापती बापट रस्त्याने कृषि महाविद्यालयार रॅलीची सांगता होईल. चाहत्यांना करंडकाची झलक बघायला मिळावी यासाठी रॅली सिम्बायोसिस महाविद्यालय, बीएमसीसी आणि फर्ग्युसन महाविद्यालय येथे काही काळ थांबविण्यात येणार आहे.
तीन तास चालणाऱ्या या रॅलीमध्ये महाराष्ट्राचीसल आजी माजी खेळाडू, रणजीपटू आणि संघटनेचे अन्य भागधारक सहभागी होणार आहेत. विविध सायकलिंग क्लब, मोटरसायकल रायडर्स गट आणि मॅरेथॉन धावकांना रॅलित सहभागी होण्याचे आवाहन या वेळी रोहित पवार यांनी केले. आम्ही ढोल-ताशाच्या निनादात खास महाराष्ट्रीय पद्धतीने करंडकाचे स्वागत करू असेही पवार म्हणाले.
सर्व सामान्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सर्वाधिक तिकिटे उपलब्ध करून दिली असून, असा निर्णय घेणारी देखिल महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही देशातील एकमेव संघटना आहे. रहदारी आणि पार्किंगचा प्रश्न निकालात काढण्यात आला असून, यासाठी स्टेडियमच्या आजूबाजूची ६ एकर जागा खरेदी करण्यात आल्याची माहितीही पवार यांनी या वेळी दिली. पत्रकार परिषदेस संघटनेचे सचिव शुभेंद्र भांडारकर, सर्वोच्च परिषदेचे सदस्य सुहास पटवर्धन, सुनिल मुथा, सुशिल शेवाळे, एमसीएचे सीओओ अजिंक्य जोशी उपस्थित होते. (‘Maharashtra Cricket Association First to Organize Rally for World Cup Trophy’ – Rohit Pawar)
महत्वाच्या बातम्या –
“मी अजूनही बाबरला मेडन ओव्हर टाकू शकतो”, माजी पाकिस्तानी गोलंदाजाची खरमरीत टीका
हॅंगझू एशियन गेम्सचे रंगारंग उद्घाटन! लवलिना-हरमनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व