महाराष्ट्राच्या महिलांनी दोन्ही सामने जिंकत, तर पुरुषांनी समिश्र यश मिळवीत “१०व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी” स्पर्धेत बाद फेरी गाठली आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आंध्र प्रदेश राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने आंध्र प्रदेश-गुंटुर येथील सुर्यलंका बीचवर सुरू असलेल्या महिलांच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने आपल्या क गटात दोन्ही सामने जिंकत धडाक्यात बाद फेरी गाठली.
पहिल्या सामन्यात त्यांनी तेलंगणाचा ६१-२८असा धुव्वा उडविला. अंकिता जगताप,श्रद्धा पवार यांच्या आक्रमक चढाया त्याला राणी उपहार, माधुरी गवंडी यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे सहज शक्य झाले.
महाराष्ट्राने मध्यांतराला २९-११अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. नंतर आणखी जोरदार खेळ करीत हा विजय सोपा केला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने पंजाबला ४९-२१असे नमवित या गटात अव्वल स्थान पटकाविले.
मध्यांतराला २७-१३ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात आपल्या आक्रमणाची धार आणखी तेज करीत हा सामना २८गुणांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावे केला.उत्तरार्धात पंजाबचा प्रतिकार अगदीच दुबळा होता.
या सामन्यात अंकिता जगताप,मोनाली घोंगे यांच्या चढाया आणि राणी उपहार, कोमल देवकर यांच्या पकडीचा खेळ महत्वाचा ठरला.
महाराष्ट्राच्या पुरुषांना आज समिश्र यशाला सामोरी जावे लागले.तरी देखील त्यांनी बाद फेरी गाठण्याचे आव्हान कायम राखले. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला कर्नाटककडून ४९-५०असा एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागला.
पूर्वार्धात २८-३४अशा ६गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने उत्तरार्धात जोरदार कमबॅक केले.
तरी देखील त्यांना पराभव पत्करावा लागला. ओमकार जाधव, आशिष मोहिते,प्रमोद घुले यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात त्यांना २गुणांनी अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात मात्र हा संघ “करो या मरो” या जिद्दीने उतरला. कारण समोर प्रतिस्पर्धी होता सेनादलाचा संघ. या सामान्यात पराभव म्हणजे आपले आव्हान साखळीतच आटपणार हे नक्की.
या सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातच झोकात केली. सामन्यावर पहिल्या पासूनच नियंत्रण ठेवत मध्यांतराला १८-१५अशी आघाडी आपल्याकडे राखली. मध्यांतरानंतर संथ व सावध खेळ करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची काळजी घेतली.
प्रशिक्षक दिनेश पाटील व संघनायक दादासो आवाड यांनी उत्तरार्धात एकमेकांच्या संमतीने चांगले डावपेच आखले.
दादासो आवाड, ओमकार जाधव यांच्या कल्पक चढाया त्याला आशिष मोहिते, प्रमोद घुले यांची पकडीची मिळालेली भक्कम साथ त्यामुळे महाराष्ट्राने सेनादल सारख्या बलाढ्य संघाला चकवित बाद फेरीचा आपला मार्ग मोकळा केला.