पुणे। महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुले या दोन्ही विभागात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मुलींच्या १७ वर्षाखालील गटातील उपांत्य फेरीत महाराष्ट्राला उत्कंठापूर्ण लढतीत पंजाबकडून ८०-७३ असा पराभव स्वीकारावा लागला.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. पूर्वार्धात पंजाबकडे ३३-२० अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. त्यांच्याकडून हरसिमरान कौर हिने ३५ गुण नोंदवित महत्त्वाचा वाटा उचलला. कनिष्का धीर हिने १७ गुण नोंदवित तिला चांगली साथ दिली. महाराष्ट्राकडून सिया देवधर (२४ गुण) व सुझान पिन्टो (२० गुण) यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली.
मुलांच्या २१ वर्षाखालील गटात तामिळनाडू संघाने महाराष्ट्राचा ७८-५७ असा सहज पराभव केला. पूर्वार्धात त्यांच्याकडे ३५-२८ अशी आघाडी होती. त्यांच्याकडून हरीराम (२१ गुण) व शेल्डान रोशन (१७ गुण) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. महाराष्ट्राच्या कर्णधार समीर कुरेशी याने २० गुण नोंदवित एकाकी झुंज दिली.
व्हॉलिबॉलमध्येही निराशा
महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉलपटूंना येथे निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. त्यांना २१ वर्षाखालील मुलींच्या गटात केरळने २५-१९, २५-१८, २५-२२ असे सरळ तीन सेट्समध्ये पराभूत केले.