वडोदरा। सध्याचा राष्ट्रीय चॅम्पियन दिल्लीचा टेबल टेनिस खेळाडू पायस जैन व पश्चिम बंगालच्या मुनमुन कुंडु यांनी युटीटी 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटाचे जेतेपद मिळवले.
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) यांच्या मान्यतेखाली सामा इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम वडोदरा येथे स्पर्धा सुरु आहे.
भारताचा तिसरा मानांकित पायसने पश्चिम बंगालच्या अनिकेत सेन चौधरीला 12-10, 9-11, 12-10, 11-7 असे मुलांच्या अंतिम सामन्यात नमविले. मुनमुनने अव्वल मानांकित दिल्लीच्या वंशिका भार्गवला 11-7, 11-6, 11-4 असे एकतर्फी झालेल्या सामन्यात पराभूत केले.
मी सुरुवातीला काही चुका केल्या. अनिकेत देखील चांगला खेळ करत होता. पहिल्या सेटमध्ये 8-10 अशा पिछाडीवरुन आगेकूच केली. यानंतर आक्रमक खेळ करत सामना जिंकला असे पायस सामना जिंकल्यानंतर म्हणाला.
दिल्लीच्या खात्यामध्ये आणखीन दोन वैयक्तिक पदक मिळवले. श्रेयांश गोयल व तिशा कोहली यांनी 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटामध्ये चमक दाखवली.
अव्वल मानांकित श्रेयांशने हरयाणाच्या वेस्ले डो रोसारिओचा 11-3, 11-8, 7-11, 11-7 असा मुलांच्या अंतिम सामन्यात पराभव केला.तर, तिशा कोहलीने महाराष्ट्रच्या विधी शाहवर 11-6, 8-11, 11-9, 12-10 असा विजय मिळवला.
अदीती सिन्हा, तेजल कांबळे व विधी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने मुलींच्या 19 वर्षाखालील गटातील सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात दिल्लीवर 3-2 अशा फरकाने विजय मिळवला.
स्पर्धा युटीटी व टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा (टीटीएबी) यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे.स्पर्धेला स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ गुजरात(एसएजी), गुजरात राज्य टेबल टेनिस असोसिएशन(जीएसटीटीए) व वडोदरा महानगर सेवा सदन (विएमएसएस) यांचा पाठींबा आहे. आयओसीएल, ओएनजीसी, गेल आणि जीएसीएल याचे प्रायोजक आहेत.