पुणे। भारताचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठेच बळ मिळाले आहे. पुण्यातील “लक्ष्य” या क्रीडा क्षेत्रातील अव्वल स्वयंसेवी संस्थेने शरथ कमलला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे त्याला ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा 9वेळा जिंकण्याचा मान मिळविणारा शरथ कमल हा पहिला खेळाडू असून त्याने कमलेश मेहताचा आठ राष्ट्रीय विजेतेपदांचा विक्रम मोडला आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शरथने याआधी 2004, 2008 आणि 2016 या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून आगामी टोकियो ऑलम्पिक ही त्याची चौथी ऑलिम्पिक स्पर्धा ठरेल.
याविषयी अधिक माहिती देताना “लक्ष्य”चे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, विश्व क्रमवारीत सध्या 33वे मानांकन असलेल्या शरथला टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही उत्तम संधी आहे. तसेच, तज्ञांच्या मते मिश्र दुहेरी गटांत मणिका बात्राच्या साथीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याची शरथला चांगली संधी आहे.
“लक्ष्य”चे खजिनदार भरत शहा म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिक काही महिन्यांवर येऊन ठेपले असताना “लक्ष्य”चा पाठिंबा शरथसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
13 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात शरथ कमल भारतीय टेबल टेनिस संघाबरोबरच जर्मनीतील ड्युसेल डॉर्स येथे प्रशिक्षण व सरावासाठी रवाना होणार आहे. पोर्तुगाल येथे 22 ते 26 जानेवारी रोजी दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून टोकियो ऑलिम्पिक-2020 स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा भारतीय पुरुष संघाचा प्रयत्न आहे. शरथ कमल व जी साथीयन यांच्याकडे या संघाचे नेतृत्व आहे.
यावेळी “लक्ष्य”च्या खेळाडू व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले की, भारतीय टेबल टेनिस संघाला देण्यात येणारा सर्वांगीण पाठिंबा या मोक्याच्या क्षणी अतिशय महत्वाचा ठरणार असून खेळाडूंचा आत्मविश्वास आणि त्यांची कामगिरी उंचावणारा ठरेल, असा आम्हांला विश्वास वाटतो. तसेच, “लक्ष्य”च्या पाठिंब्याचा शरथ कमल पुरेपूर उपयोग करून घेईल, अशी आमची खात्री आहे.
यावेळी शरथ कमल म्हणाला की, टेबल टेनिसला पाठिंबा देणाऱ्या फारच कमी संस्था भारतात आहेत. या निवडक संस्थांपैकी “लक्ष्य” ही महत्वाची संस्था असून मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
आगामी 2ते 3 आठडवड्यात आम्ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळणार आहोत आणि सांघिक गटात ऑलिम्पिक साठी प्रथमच पात्र ठरण्याची भारताला संधी आहे. आम्ही एकेरी व दुहेरी या गटातही खेळणार असून आमचे मुख्य लक्ष सांघिक गटाबरोबरच एकेरी गटातही पात्रता मिळविणे आहे.
गेल्या वर्षी सांघिक जागतिक मानांकनात 9व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने डिसेंबर अखेर 8व्या क्रमांकावर धडक मारली असून आमची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. चांगला ड्रॉ मिळविण्यात आम्ही सुदैवी ठरलो, तर आम्हांला पदकाचीही आशा करता येईल, असे त्याने सांगितले.
कमल पुढे म्हणाला की, मी सर्व प्रथम 2003 मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी भारतीय संघ जागतिक मानांकनात 33-34व्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या 16-17 वर्षात भारतीय टेबल टेनिस पटूंनी चांगली प्रगती केली आहे.
त्यामुळेच आम्ही आता 8व्या क्रमांकापर्यंत पोहचू शकलो आहोत. सांघिक स्पर्धेत खेळणारा भारतीय संघ उत्कृष्ट असून माझ्यासोबत खेळणारा जी साथीयन हाही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने एकेरी विश्वक्रमवारीत 30व्या स्थानी मजल मारली आहे.
ऑलिम्पिकमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावता आली , तर आम्ही ऑलिम्पिक मधील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करू. आमच्या संघातील इतर खेळाडूही अव्वल 100 मानांकनातील असल्याने भारतीय संघाला नक्कीच चांगली संधी आहे.
लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या खेळाडूंची यादी-
स्वप्निल कुसळे(नेमबाजी- नांदेड सिटी),
सोनिया लाथर(मुष्ठियुध्द-भारत फोर्ज),
यश आराध्या(गोकार्टींग मोटर स्पोर्टस्- भारत फोर्ज),
विदित गुजराती(बुध्दिबळ- भारत फोर्ज),
शुभंकर डे(बॅडमिंटन-भारत फोर्ज),
प्रिथा वर्टीकर(टेबल टेनिस-दालमिया मानव सेवा ट्रस्ट),
सिमरनजीत कौर(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
सचिन सिवाच(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
निरज फोगट(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
नुपुर हगवणे पाटील(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
आयुषी पोतदार(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
मल्लिका मराठे(टेनिस-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
सचेत पिन्नानाथ(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
रौनक साधवाणी(बुध्दिबळ-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
शरण्या गवारे(टेनिस-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्),
सालसा आहेर(टेनिस-जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल),
रेश्मा माने(कुस्ती- कांतिलाल लुंकड फाउंडेशन),
साक्षी शितोळे(तिरंदाजी- सायबेज खुशबु/खुशबू चॅरिटेबल ट्रस्ट),
सुहाना सायनी(टेबल टेनिस- शेविएट कंपनी),
माहक जैन (शेविएट कंपनी),
सिमरन कौर(कुस्ती-सुहाना प्रविण मसाले),
नमन तंवर(मुष्ठियुध्द- मोर्डे फुडस्),
ऋतुजा भोसले(टेनिस- भारत फोर्ज),
अक्षय कुमार(मुष्ठियुध्द- बुक अ स्माईल),
निशा मलिक(कुस्ती-बुक अ स्माईल),
नताशा दुमने(तिरंदाजी-बुक अ स्माईल),
प्राप्ती सेन(टेबल टेनिस- बुक अ स्माईल),
मनिश(मुष्ठियुध्द- बुक अ स्माईल),
साजन भानवल(ग्रेको रोमन कुस्ती-बुक अ स्माईल),
अदित्य मित्तल(बुध्दिबळ- सोनी पिक्चर्स नेटवर्कस्)