चेन्नई : महाराष्ट्राची नेमबाज प्राची गायकवाडने, थाळीफेकीत भक्ती गावडेने व बास्केटबॉलमध्ये मुलींच्या संघाने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत प्रत्येकी १ कांस्य पदक मिळविले. सायंकाळच्या सत्रात मैदानी स्पर्धाना सुरुवात होणार आहे. यामध्ये देखील अनेक पदके मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेत उद्यापासून वेटलिफ्टिंगला सुरुवात होत आहे. मागील खेलो इंडिया स्पर्धेत देखील या खेळांत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली होती.
नेमबाजीमध्ये प्राची गायकवाडचा कांस्यपदकाला वेध
महाराष्ट्राच्या प्राची गायकवाड हिने मुलींच्या पन्नास मीटर्स थ्री पोझिशन विभागात कांस्यपदकाला वेध घेतला. तिचे ४३९.६ गुण झाले. तिला पहिल्या पाच क्रमांकामध्ये नसलेल्या प्राची हिने स्टँडिंग पोझिशन मध्ये उत्तम कौशल्य दाखवीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. अनुष्का ठाकूर, कर्नाटक (४६०.८०) व मेलविना एंजिलेना, तामिळनाडू (४५०.३) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.
प्राची ही मुंबईत अरुण वारेसी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तसेच वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तिला गन फॉर ग्लोरी अकादमीतील बिबास्वान गांगुली व शुभम पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. प्राची हिचे वडील शशिकांत हे पोलीस दलात असून त्यांच्या प्रोत्साहनामुळेच लहानपणापासून प्राची हिला नेमबाजीची आवड निर्माण झाली. तिने पाचव्या वर्षीच नेमबाजीच्या सरावास प्रारंभ केला. दहाव्या वर्षी ती एअर रायफलकडे वळली आणि इसवी सन २०२० पासून ती थ्री पोझिशन या प्रकारात भाग घेत आहे. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्निल कुसाळे हे तिच्यासाठी आदर्श खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला यश मिळवायचे आहे. यापूर्वी तिने अखिल भारतीय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
महाराष्ट्राच्या वेदांती भट हिचे मात्र कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथे स्थान मिळाले. तिने ४२६.७ गुणांची नोंद केली.
मुलींच्या बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदक
महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर ९० विरुद्ध ७१ असा शानदार विजय मिळविला आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील मुलींच्या बास्केटबॉल मध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
महाराष्ट्राने उत्कृष्ट सांघिक कौशल्याच्या जोरावर या सामन्यात सुरुवातीपासूनच आपली आघाडी राखली होती. पहिल्या डावात २५-२२ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने मध्यंतराला ५१-३२ अशी आघाडी मिळविली होती. तिसऱ्या डावा अखेर त्यांनी ही आघाडी ७४-४७ पर्यंत वाढविली होती. महाराष्ट्राकडून सानिका फुले (२० गुण), अनया भावसार (१८ गुण), मानसी निर्मळकर (१६ गुण) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. महाराष्ट्र संघास जयंत देशमुख व ललित नहाटा यांचे मार्गदर्शन लाभले होते. मध्यप्रदेश संघाकडून गुणवी अग्रवाल (२२) व सानिया प्रधान (१३) यांनी दिलेली लढत अपुरी पडली.
थाळीफेकमध्ये भक्ती गावडे कांस्यपदकाची मानकरी
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भक्ती गावडेने बुधवारी रात्री उशीरा झालेल्या मुलींच्या थाळीफेकमध्ये कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली. तिने ४३.६७ अंतरापर्यंत थाळी फेक केली. ती बारामती येथील खेळाडू असून आजपर्यंत तिने राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार यश मिळविले आहे.
वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला चमकदार यशाची अपेक्षा
खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगच्या खेळाडूंनी नेहमीच चमकदार यश मिळवून दिले आहे. यंदाही अपवाद ठरणार नाही असे महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी सांगितले. महाराष्ट्राला यंदा आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मोनिका मोहिते, भूमिका पोळ निखिल कोळी, अनुष लोखंडे, साईराज परदेशी, महादेव वडार, आदित्य मोरे,सार्थ जाधव इत्यादी खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे. या स्पर्धेला शुक्रवारी येथे प्रारंभ होत आहे.
महत्वाच्या बातम्या –
संपूर्ण यादी । विराट चौथ्यांदा ठरला ODI Cricketer Of The Year, याआधी हे भारतीय खेळाडूही ठरलेत मानकरी
नुसती यादी पाहून डोळे फिरतील! आयसीसीचे 10 ॲवॉर्ड्स मिळवणारा विराट जगात एकमेव