मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर यांचं मुंबईतील शिवाजी पार्कसोबत विशेष नातं होतं. याच ठिकाणी त्यांनी सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं, जे पुढे जाऊन भारतीय संघासाठी खेळले.
आता महाराष्ट्र सरकारनं आचरेकर सरांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्कवर स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांचं 2 जानेवारी 2019 रोजी मुंबईत निधन झालं होतं. नगरविकास विभागानं जारी केलेल्या जीआरनुसार, राज्य सरकारनं शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 5 येथे रमाकांत आचरेकर यांचं 6x6x6 आकाराचं स्मारक बांधण्यास मान्यता दिली. मुंबईच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं या स्मारकाची शिफारस केली होती.
स्मारकाचं बांधकाम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची असेल, असंही जीआरमध्ये नमूद करण्यात आलंय. तसेच स्मारकाच्या आराखड्याला मंजुरी देताना एकही झाड तोडू नये, असंही त्यात म्हटलं आहे. पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी बी.व्ही.कामथ मेमोरियल क्लबकडे असेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून वेगळा निधी दिला जाणार नाही, असं या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट टाकून आभार व्यक्त केलं. आहे. सचिन म्हणाला, “आचरेकर सरांचा माझ्या आणि इतर अनेकांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं बोलतो. त्यांचं आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरलं. शिवाजी पार्कमध्ये कायमचंच राहण्याची त्यांची इच्छा असावी. आचरेकर सरांचा पुतळा त्यांच्या कर्मभूमीवर उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे.”
राज्य सरकारच्या या निर्णयावर रमाकांत आचरेकर यांची मुलगी विशाखा आचरेकर-दळवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘ईटीव्ही भारत’च्या पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “आम्ही सर्वजण याची वाट पाहत होतो. माझ्या वडिलांनी त्यांचं अख्खं आयुष्य शिवाजी पार्कमध्ये घालवलं. ते पहाटे ४ वाजता पार्कमध्ये जायचे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्रिकेटला समर्पित केलं होतं.”
हेही वाचा –
लखनऊ रोहित शर्माला 50 कोटींमध्ये खरेदी करणार? मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट
भारताचे मोठमोठे फलंदाज या युवा फिरकीपटूसमोर गंडले! टीम इंडियात संधी मिळणार का?
‘मला बॅडमिंटनचा विराट कोहली व्हायचंय’, स्टार खेळाडूचं दिलखुलास वक्तव्य