जयपूर, 19 जून 2023 : महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने प्रीमिअर लीग हँडबॉल स्पर्धेत आणखी एक थरारक विजयाची नोंद करताना सोमवारी गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश संघावर 28-27 असा एका गुणांनी थरारक विजय मिळवला.
गोल्डन ईग्लसने हरजिंदर सिंग आणि सुखवीर सिंग ब्रार यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर दमदार सुरूवात केली. पण, आयर्नमॅच्या इगोर चिसेलिओव्ह, मनजीत आणि सुमित घंघास यांनी तोडीसतोड उत्तर दिले. पहिल्या हाफच्या मध्यंतरात महाराष्ट्र आयर्नमॅनने 7-6 अशी आघाडी घेतली.
आयर्नमॅनने स्पर्धेतील सातत्यपूर्ण खेळ कायम राखलेले पाहायला मिळाले. गोल्डन ईगल्सच्या ओमिद रेझा त्याच्यापरिने सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसला. पण, आयर्नमॅनला मोठी आघाडी काही केल्या मिळताना दिसली नाही. हरजिंदर सिंग व सुखवीर सिंग ब्रार यांनी गोल्डन ईगल्सकडून अटीतटीचा संघर्ष सुरू ठेवला होता. पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्र आयर्नमनला 15-13 अशा आघाडीवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र आयर्नमॅनकडून दुसऱ्या हाफमध्ये चिसेलिओव्ह, मनजीत, सुमित कुमार, मोहित पुनिया आणि सुमित घंघास यांनी सातत्यपूर्ण खेळ करताना गोल्स केले. त्यामुळे महाराष्ट्राची आघाडी 22-18 अशी मजबूत झालेली पाहायला मिळाली. 45 मिनिटांच्या खेळात आता महाराष्ट्राने सामन्यावर पकड घेतली होती.
मात्र, गोल्डन ईगल्सच्या ज्योतिराम भुषण शिंदे आणि महेश उगिळे यांनी दमदार पुनरागमन करताना महाराष्ट्र संघाची चिंता वाढवली, परंतु महाराष्ट्राने प्रत्येक संधीचं सोनं करताना आघाडी कायम राखली होती. अखेरीस महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने 28-27 असा निसटता विजय निश्चित केला.
इगोर चिसेलिओव्हने सर्वाधिक 8 गोल्स केले, गोल्डन ईगल्सकडून हरजिंदर सिंगने 8 गोल्स केले. चिसेलिओव्हला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला.
अंतिम गुण – महाराष्ट्र आयर्नमॅन 28 वि. वि. गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश 27