कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी : हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांनी गादी विभागातून आगेकूच करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या पहिल्या लढतीत २०१९ महाराष्ट्र केसरी विजेता व नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने अहमदनगरच्या सुदर्शन कोतकरला ३-० असे पराभूत केले. पहिल्या दीड मिनिटात दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली. त्यानंतर मात्र सुदर्शन कोतकरला कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. मात्र तो, गुणांची कमाई करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला १ गुण देण्यात आला. दुसऱ्या फेरीत देखील सुदर्शन कोतकरला ताकीद देण्यात आली. यावेळी देखील तो गुण मिळविण्यासाठी अपयशी ठरला. यावेळी हर्षवर्धनने हफ्ते डावावर एका गुणाची कमाई केली. त्यानंतर हर्षवर्धनने सुदर्शनला वर्तुळाच्या बाहेर ढकलत एक गुण कमावताना लढत जिंकली.
गादी विभाग कल्याणचा नरेश म्हात्रेने वाशीमच्या वैभव मानेला ४-२ असे पराभूत केले. पहिल्या फेरीतच नरेशने ३ गुणांची झटपट कमाई केली. दुसऱ्या फेरीत वैभवने आक्रमक खेळाला सुरुवात केली. पहिल्या १५ सेकंदातच वैभवाने नरेशला वर्तुळाच्या बाहेर ढकलताना १ गुणांची कमाई केली. मात्र त्यानंतर १५ सेकंदाने नरेशने वैभवाला मॅटच्या बाजूला ढकलताना पुन्हा ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोरदार प्रतिआक्रमण करत वैभवने एक गन मिळवला, परंतु लढत जिंकण्यास वैभव अपयशी ठरला.
नागपूरच्या राकेश देशमुखने यवतमाळच्या राजेश एकणारला १०-० असे पराभूत करताना आगेकूच केली. पहिल्या राकेश देशमुखने वर्तुळाबाहेर ढकलत २ गुणांची कमाई केली. पुन्हा लढत सुरु झाल्यानंतर राकेश देशमुखने भारंदाज डाव टाकताना चार गुणांची कमाई केली. त्यानंतर पुन्हा भारंदाजच डाव टाकत परत ४ गुणांची कमाई करताना लढत जिंकली.
गादी विभागात बीडच्या आतिश तोडकरने सुवर्णपदक, कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने रौप्यपदक तर कोल्हापूरच्या अतुल चेचर व पुण्याच्या विजय मोदर याना कांस्य पदक विभागून देण्यात आले.
८६ किलो गटात गादी प्रकारात पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापला सुवर्ण, तर उस्मानाबादच्या मुंतजीर सरनौबतला रौप्य तर सोलापूर शहरच्या एकनाथ बदरे व सातारच्या विजय डोईफोडे याना कांस्य पदक विभागून देण्यात आले.
86 किलो वजनी गट गादी विभाग
प्रथम – प्रतिक जगताप, पुणे
द्वितीय – मुंतजिर सरनौबत, उस्मानाबाद
तृतीय – एकनाथ बदरे, सोलापूर आणि विजय डोईफोडे, सातारा
57 किलो वजनी गट गादी विभाग
प्रथम – अतिश तोडकर, बीड
द्वितीय- सुरज अस्वले, कोल्हापूर
तृतीय – अतुल चेचर, कोल्हापूर व विजय मोदर, पुणे
(Maharashtra Kesari 2023 Day 2 Mat Harshvardhan Sadgir Win Pratik Jagtap Won Gold)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिहान, रिवाने बाजी मारली; धीरूभाई अंबानी शाळेला टेनिसचे सांघिक विजेतेपद
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’