कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत चौथ्या दिवशी खुल्या गटातून गादी विभागातील उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. नाशिकचा 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने उपांत्य फेरीत तुषार दुबे याचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारला. तर, दुसऱ्या सामन्यात नांदेडच्या शिवराज राक्षे याने हिंगोलीच्या गणेश जगताप ला गुणांच्या आधारे पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
चौथ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत काहीसे संमिश्र निकाल प्रेक्षकांना पाहायला मिळाले. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचे गदा उंचावण्यासाठी उत्सुक असलेल्या हर्षवर्धन सदगीर याने वैभव मानेचा पराभव करत उपांत्य फेरीत जागा मिळवली. भक्कम बचावासाठी ओळखल्या गेलेल्या तुषार दुबे याने अक्षय मंगवडे याला पराभूत केले. महाराष्ट्र कुस्तीतील उगवता तारा असलेल्या गणेश जगताप याने सुबोध पाटीलचा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. तर, पुण्याचाच असलेल्या मात्र नांदेडसाठी खेळत असलेल्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्ह्याच्या माऊली कोकाटे याला आसमान दाखवत पुढील फेरीचे तिकीट आपल्या नावे केले.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तुषार दुबे व हर्षवर्धन सदगीर यांच्यात बचावात्मक खेळ पाहायला मिळाला. यामध्ये अखेर सदगीर याने विजयश्री प्राप्त करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याच्या दृष्टीने मजल मारली. तर एक प्रकारे स्थानिक खेळाडूच असलेल्या गणेश जगताप व शिवराज राक्षे यांच्यातील लढतीत शिवराजने 11-0 असा विजय मिळवत गादी विभागाच्या अंतिम फेरीत मजल मारली.
तत्पूर्वी, माती विभागातून वाशिमचा सिकंदर शेख व सोलापूरचा महिंद्र गायकवाड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या गटाच्या अंतिम फेरीचे व महाराष्ट्र केसरीची लढत शनिवारी (14 जानेवारी) रोजी खेळली जाईल.
(Maharashtra Kesari 2023 Mat Harshvardhan Sadgir And Shivraj Rakshe Entered In Final)