कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत चौथ्या दिवशी खुल्या गटातून माती विभागातील उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या वाशिम जिल्ह्यासाठी खेळणाऱ्या सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी जालनाच्या बाला रफिक शेख याला आस्मान दाखवत अंतिम फेरीत धडक मारली. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या महिंद्रा गायकवाड यानेही कोल्हापूरचा शुभम शिदनाळे याला चितपट करत अंतिम फेरीत जागा मिळवली.
चौथ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत काहीसे अपेक्षित निकाल प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सध्या आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवत असलेल्या महेंद्र गायकवाड याने 2019 चा उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके याला पराभूत करत पुढे चाल मिळवली. तर, यावर्षी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला कोल्हापूरचा शुभम शिदनाळे याने संदीप मोटे याच्यावर मात केली. विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार असलेला सिकंदर शेख आपल्या लौकिकास साजेसा खेळला. त्याने मागील वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याला धूळ चारली. तर, अखेरच्या उपांत्य पूर्व फेरीत 2018 चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने अरुण बोंगार्डे याला अस्मान दाखवले.
त्यानंतर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाड याने चांगली झुंज देत असलेल्या शुभम शिदनाळे याला 6 गुणांची आघाडी असल्यानंतर चितपट करत अंतिम फेरीत मजल मारली. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात अतिशय वेगवान झालेल्या कुस्तीत सिकंदर शेखने पिछाडीवरून पुढे येत बाला रफिक शेखला चित्रपट करत महाराष्ट्र केसरीच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली
(Maharashtra Kesari 2023 Sikandar Shaikh And Mahendra Gaikwad Enters In Final)