पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्र केसरीची गदा कोण घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
डाव- प्रतिडावांची खेळी करीत पुण्याचा प्रतिभावान युवा मल्ल अभिजीत कटके याने प्रतिष्ठेच्या गदेवर आपले नाव कोरले. अभिजितने कुस्ती जिंकली असली तरी साताºयाच्या किरण भगतने महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मने जिंकली.
समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत झाली.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीष बापट, रामराजे नाईक निंबाळकर, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वास नांगरे पाटील, मोहन जोशी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, संदीप भोंडवे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, कुस्ती हा ऐतिहासिक खेळ असून याला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. एवढया मोठया संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित असल्याने या खेळाचे महत्त्व वाढल्याचे दिसून आले आहे. शरद पवार म्हणाले, संपूर्ण हिंदुस्थानचे लक्ष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे असते. भूगावमध्ये झालेल्या या कुस्ती स्पर्धेला हजारोंची उपस्थिती असून यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळणार आहे.
अभिजीत काटकेला चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महिंद्रा थार ही गाडी बक्षीस स्वरुपात देण्यात आली. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतला बुलेट देऊन सन्मानित करण्यात आले.
*अशी झाली किताबी लढत-
लाखो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत पुण्याचा अभिजित कटके आणि साताºयाचा किरण भगत यांच्या लढतीला सुरुवात झाली. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीच्या काही मिनिटात एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. पुढचे काही सेकंद काहीच घडत नव्हते. संपूर्ण मैदानावर शांतता पसरली होती. कुस्तीच्या सुरुवातीला अभिजितने किरणच्या हाताला चुकीच्या पद्धतीने हिसका दिला. त्यामुळे किरणचा हात दुखावला आणि त्यामुळेच तो मॅटच्या बाहेर पडला आणि अभिजितला याचा १ गुण मिळाला. अभिजितला पंचांनी ताकीद दिली आणि पुन्हा कुस्ती सुरु झाली. त्यानंतर दोघेही आक्रमक झाले. काही वेळ खडाखडी झाल्यानंतर दोघांनाही कुस्ती करण्याची ताकीद देण्यात आली. एक मिनिटापर्यंत १-० अशी बरोबरी होती.
दुसºयाच मिनिटाला अभिजितने आक्रमक होऊन झोळी धरली आणि २ गुण मिळविले. झोळीची सुटका करुन अभिजितच्या पाठीवर येऊन किरणने १ गुणाची कमाई केली. मध्यंतरापूर्वी ३-१ अशी गुणसंख्या होती. मध्यंतरानंतर किरण पुन्हा आक्रमक झाला. खाली खेचण्याच्या अभिजितचा प्रयत्न त्याने २ वेळा धुडकावून लावला.
त्यानंतर पंचांनी किरणला कुस्ती करण्याची ताकीद दिली. पुन्हा अभिजितने किरणच्या हाताला चुकीच्या पद्धतीने झटका दिला. त्याचवेळी किरणच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेऊन गुणांची मागणी केली. व्हिडीओ पाहून पंचांनी अभिजितच्या विरोधात २ गुण किरणला बहाल केले. यावेळी ३-३ अशी बरोबरी झाली होती. निष्क्रियतेच्या विरोधात अभिजितला १ गुण मिळाला.
पुढच्या मिनिटाला किरणने उंचीवरुन अभिजितला खाली घेतले, यावेळी किरणच्या प्रशिक्षकांनी ४ गुण द्यायला हवेत, असा आक्षेप घेतला आणि निकाल किरणच्या बाजूने लागला. दुसºया फेरीत ४-७ अशी गुणसंख्या होती. पुढच्या क्षणात अतिशय चपळाईने आकडी डाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिजितने त्याला न जुमानता हाफ्ते करुन पकड घेतली व त्याला २ गुण मिळाले.
त्या पकडीतून शेवटच्या २३ सेकंदात अभिजितने भारंदाज डाव टाकून २ गुणांचीही कमाई केली. यावेळी ८-७ अशी गुणसंख्या होती. त्यानंतर किरणने देखील कुंडी डाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा अभिजितने त्याचा डाव धुडकाविला. अभिजीतने किरणवर आक्रमकरित्या पकड करीत आणखी २ गुण मिळविले. निर्धारीत वेळेत १०-७ ने महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला.
*कुस्ती शौकीनांची विक्रमी गर्दी- आजच्या निर्णायक कुस्तीचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कुस्तीचा कुंभमेळाच जणू भरला होता. दोन्ही मल्लांना चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. कुस्तीच्या सुरुवातीलाच दोन्ही मल्लांना टाळ््यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्या.
*ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची उपस्थिती – सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणारा विजय चौधरीने देखील आजची निर्णायक कुस्ती पाहण्यासाठी हजेरी लावली होती. आखाड्यावर येऊन त्याने अतिशय नम्रपणे सर्वांना अभिवादन केले. आखाड्यावर जाऊन आखाड्याला देखील नमस्कार केला.
* कुस्ती ही कटके घराण्याची परंपरा – अभिजीतची पाचवी पिढी
पुण्याचा अभिजीत कटके हा अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत सराव करतो. पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा अभिजीत मुलगा. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळविली आहे.
कटके घराण्यामध्ये पैलवानकीची परंपरा असून अभिजीतच्या रुपाने पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्टस् मध्ये देखील तो सराव करतो. भरत म्हस्के, हणमंत गायकवाड आणि तालमीचे वस्ताद गुलाब पटेल यांचे देखील त्याला मार्गदर्शन मिळते. त्याचे प्रशिक्षक अमर निंबाळकर यांच्या मते, ताकद हे अभिजीतचे मुख्य वैशिष्टय आहे.
प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य खेळी तो करतो. पुढील सरावातून तो आॅलिंपीकसाठी देखील पात्र होईल. सकाळी ४,३० वाजता त्याचा दिवस सुरु होतो. ज्युस, बदाम, थंडाई, तूप, आठवडयातून चार वेळा मांसाहार असा त्याचा आहार आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार आणि महिन्याचा ६० ते ७० हजार रुपये त्याचा खर्च आहे. इयत्ता १२ वीची बहिस्थ परीक्षा तो देत आहे. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी व यावर्षी झालेल्या स्पर्धेत उपहिंद केसरीचा किताब त्याने पटकाविला आहे.
* काका पवारांचा पठ्ठया किरण भगत
साताºयाचा किरण भगत हा मागील ६ वर्षापासून पुण्यातील आंबेगाव येथे काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात कुस्तीचे धडे घेत आहे. त्याचे वय २० वर्षेे असून वयाच्या ११ व्या वर्षापासून तो कुस्तीचे धडे घेत आहे.
खानदानी कुस्तीची परंपरा त्याला लाभली आहे. सलग तिसºयांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो उतरला आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. कुंडी डाव हे त्याचे वैशिष्ट असून त्या डावावर आल्यास कुस्ती त्याचीच असते.
मागील वर्षात त्याने ७५ कुस्त्या खेळल्या आहेत. काका पवार हे त्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत , त्यासोबतच रणधीर सिंह पोंगाल, सुनील लिम्हण, शिवाजी कोळी, शरद पवार, प्रकाश जाधव, गोविंद पवार, बदाम मुगदूम, राहुल आवारे, ज्ञानेश्वर गोचडे, योगेश पवार यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन किरणला मिळते.
*महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो) इतर निकाल –
माती विभाग – १) किरण भगत (सातारा), २) बाला रफिक शेख (बुलढाणा), ३) तानाजी झुंजूरके (पुणे जिल्हा). गादी विभाग – १) अभिजित कटके (पुणे शहर), २) अक्षय शिंदे (बीड), ३) विष्णू खोसे (अहमदनगर), गणेश जगताप (हिंगोली).