पुणे | समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगांव येथे ही स्पर्धा दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेत गतविजेता आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार नाही. विजय सध्या नाशिक येथे डीवायएसपी पदाचे प्रशिक्षण घेत आहे तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार एकदा ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले की पुन्हा स्पर्धेत उतरता येत नाही. त्यामुळे यावेळी महाराष्ट्र केसरी कोण बनणार याकडे तमाम कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये सर्वात आघडीवर नाव आहे ते पुण्यातील अभिजित कटकेचे. हा खेळाडू मॅट प्रकारात खेळत असून तो हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गेल्यावेळी उपविजेता राहिला आहे. अभिजित हा राष्ट्रीय स्थरावर सध्या चांगली कामगिरी करत असून त्याच्याकडे भारताचे कुस्तीमधील भविष्य म्हणून पाहिले जात आहे.
२००७ आणि २००८ मध्ये महाराष्ट्र केसरी जिंकणारा चंद्रहार पाटील नाव आता महाराष्ट्रात नक्कीच नवीन नाही. यावेळी हा खेळाडू पुन्हा मैदानात उतरून ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे. विजय चौधरी आणि नरसिंग यादव हे आजपर्यंतचे ट्रिपल महाराष्ट्र्र केसरी सलग ३ विजेतेपदं जिंकून ट्रिपल केसरी झाले आहेत. चंद्रहार पाटीलला असा करिष्मा जरी करता येणार नसला तरी त्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनण्याची चांगली संधी आहे.
२०११ पासून २०१६ पर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजय चौधरी आणि नरसिंग यादव या दोनच मल्लांनी जिंकली आहे. या काळात कोणताही दुसरा विजेता मिळाला नाही. परंतु यावेळी अन्य मल्लांमध्ये खेडचा शिवराज राक्षे, सोलापूरचा विक्रांत जाधव आणि कोल्हापूरचा महेश वरूटे या तरुण मल्लांनाही विजेतेपदाची मोठी संधी आहे.
पुण्यातील सणस मैदान येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या सोलापूरच्या माउली जमदाडे आणि सातारच्या किरण भगतवरही कुस्तीप्रेमींचे लक्ष असणार आहे. त्यांच्याकडून यावेळी मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहे.