पुणे | समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले होते. यावेळी शांताराम इंगवले, शिवाजी तांगडे, अनिल पवार, कैलास मोहोळ, सुरेश हरपुडे, अनिल मोहोळ, विजय मोहोळ, सुरेश मोहोळ गणेश मोहोळ, रमाकांत साळुंके, निवृत्ती चोंधे, अजिंक्य मोहोळ, विजय जाधव, संजय भामरे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नामवंत मल्लांच्या माती व गादीवरील कुस्त्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहेत. सर्वाधिक उत्कंठा असलेली महाराष्ट्र केसरीची लढत शनिवार दिनांक २४ डिसेंबर रोजी होईल.
स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील तब्बल ९०० मल्ल सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ९० मार्गदर्शक आणि संघव्यवस्थापक, १२५ तांत्रिक अधिकारी व ८० पदाधिका-यांचे स्पर्धेसाठी सहकार्य मिळणार आहे. मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. मंगळवारी अनेक संघ पुण्यात दाखल झाले. तसेच दुपारी पंच उजळणी वर्ग घेण्यात आला. यात आंतरराष्ट्री पंच आणि कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड यांनी सर्व तांत्रिक अधिकाºयांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात गादी व माती विभागातील अ गटात ५७, ७४, ७९ किलो वजनी गटातील मल्लांचे वजन आणि वैद्यकीय तपासणी झाली. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकात,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी उपस्थित राहणार आहेत.
*लढत- वेळा – सकाळी ८ वाजता, आणि दुपारी २ ते ५
पैलवानांची मिरवणूक – दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्पर्धेत सहभागी पैलवानांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हा व शहर तालीम संघाचे कुस्तीपटू आपल्या जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करतील. तसेच महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणारे मल्ल एकाच जीपमधून मिरवणूकीत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र केसरीमध्ये प्रथमच महिला कुस्तीपटूंची लढत – यंदा महाराष्ट्र केसरीमध्ये प्रथमच महिलांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या प्रातिनिधीक कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्राची महिला कुस्तीपटू अंकीता गुंड आणि हरीयाणाची कुस्तीपटू ममता यांच्यात लढत रंगणार आहे.
मानाची गदा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दिल्या जाणा-या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. लाखो लोक महाराष्ट्र केसरीच्या किताबाची अंतिम कुस्ती पाहण्यासाठी उत्सुक असतात. विजेत्या मल्लालाही या गदेचे आकर्षण असते. चमचमणारी चांदीची गदा जो जिंकतो तो कुस्तीचा सम्राट बनतो. राज्यातील अजिंक्य मल्ल म्हणून त्या मल्लास गदा देऊन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा १९६१ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. १९८२ पर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमार्फत दिली जात होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.
अशी आहे गदा
गदेची उंची साधारण २७ ते ३० इंच असून, व्यास ९ ते १० इंच इतका असतो. वजन ८ ते १० किलो असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. २८ गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते व कुस्तीचे दैवत असणा-या हनुमानाचेही छायाचित्र असते. मागील ३४ वर्षांपासून पानगरी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करते.