पुणे | समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगांव येथे ही स्पर्धा दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, मेघराज कटके, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, संदीप इंगवले, अनिल पवार, संदीप तांगडे, कालिदास शेडगे तसेच रमेश सणस, मनोहर सणस, समीर साळुंके, कुमार शेडगे, अमोल भिलारे, बाजीराव खाणेकर, रामभाऊ चोंधे, नितीन तांगडे, संदीप चोंधे, बाळू सणस, योगेश भिलारे, जितेंद्र इंगवले उपस्थित होते.
बाळासाहेब लांडगे म्हणाले, स्पर्धेत यंदा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके , शिवराज राक्षे, तानाजी झुंजुरके, साईनाथ रानवडे (सर्व पुणे), सागर बिराजदार (लातूर), किरण भगत (सातारा), महेश वरुटे,कौतुक डाफळे (कोल्हापूर), माऊली जमदाडे, महादेव सरगर (सोलापूर) आदी अव्वल मल्ल जेतेपदासाठी लढतील. इतर वजनी गटात सुरज कोकाटे, गणेश जगताप, अभिषेक तुरकेवाडकर, तानाजी विरकर, ज्योतिबा आटकळ असे अनेक अव्वल मल्ल झुंजताना दिसतील. मागील वर्षी पुण्यातील वारजे येथे तर २००९ मध्ये सांगवी आणि २०१४ मध्ये भोसरी येथे ही स्पर्धा झाली होती.
दिनेश गुंड म्हणाले, स्पर्धा माती व गादी विभागात प्रत्येकी १० गटात होणार आहे. यात अ गटात ५७, ७४, ७९ किलो, ब गटात ६१, ७०, ८६ किलो, क गटात ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी साठी ८६ ते १२५ किलो वजनी गटाचा समावेश आहे. ड विभागात ६५ आणि ९२ किलो वजनी गटाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील तब्बल ९०० मल्ल सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ९० मार्गदर्शक आणि संघव्यवस्थापक, १२५ तांत्रिक अधिकारी व ८० पदाधिका-यांचे स्पर्धेसाठी सहकार्य मिळणार आहे. मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे.
शिवाजी तांगडे म्हणाले, कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या जन्म तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने स्पर्धेसाठी ग्रामस्थ अतिशय उत्सुक आहेत. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत स्पर्धेसाठी भव्य मैदान तयार करण्यात असून ४० हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल ५० बाय ५० फूट आकारात गादीचे दोन व मातीचे दोन आखाडे तयार करण्यात येणार आहे. स्पर्धा अतिशय योजनाबद्ध आणि चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी सर्व ग्रामस्थ काम करीत आहेत.
शांताराम इंगवले म्हणाले, महाराष्ट्र केसरी विजेत्याचा किताब पटकाविणा-या मल्लास चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच चारचाकी गाडी बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी साठी बुलेट व ९७ किलो वजनी गटातील गादी आणि माती विभागातील विजेत्याला देखील बुलेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद््घाटन गुरुवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी उपस्थित राहणार आहेत.