वडोदरा। अव्वल मानांकित व भारताची मुलींच्या ज्युनिअर गटात चौथ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषने इलेव्हन स्पोर्ट्स 64 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या विभागात रौप्यपदक तर, समृद्धी कुलकर्णीने कांस्यपदक मिळवले.मुलींच्या 19 वर्षाखालील संघाने अंतिम फेरीत धडक मारत आपले रौप्यपदक निश्चित केले.
महाराष्ट्राच्या स्वस्तिका व समृद्धी यांनी अनुक्रमे काऊन्सिल फॉर इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्सामिनेशनच्या भाविका मूलराजानी आणि गुजरातच्या मुराद आफरिनला 3-0 अशा समान फरकाने नमविले.
स्वस्तिकाने उपांत्यसामन्यात दिल्लीच्या अक्षीता गुप्ताला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवले.अंतिम अव्वल मानांकित स्वस्तिकाने कर्नाटकच्या अनारग्या मंजुनाथ विरुद्ध पहिला गेम 11-9 असा जिंकत चांगली सुरुवात केली. पण, मंजुनाथने सामन्यात जोरदार पुनरागमन करत पुढचे तिन्ही गेम 3-11, 9 11, 7-11 असे जिंकत सुवर्णपदक मिळवले.त्यामुळे स्वस्तिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
त्यापूर्वी, भारताच्या 20 व्या स्थानी असलेल्या समृद्धीला उपांत्यफेरीत अनारग्या मंजुनाथ कडून 1-3 असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तिसऱ्या स्थानी राहत तिने कांस्यपदक मिळवले. मुलींच्या 19 वर्षाखालील सांघिक गटात महाराष्ट्राच्या संघाने तमिळनाडूविरुद्ध चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात 3-2 असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्यांचा सामना पश्चिम बंगालशी होणार आहे. अंतिम फेरीत धडक मारल्याने त्यांनी रौप्यपदक निश्चित केले.