पुणे। महाराष्ट्रीय मंडळातर्फे हौशी खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होणा-या स्पर्धेला २६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत चालणारी ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर सभागृहात होणार आहे.
महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले म्हणाले, या स्पर्धेसाठी ९००हून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेत वयवर्षे ११, १३, १५, १७ मुले-मुली, पुरुष व महिला एकेरी-दुहेरी, ४० वर्षांवरील पुरुष दुहेरी अशा गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धा दररोज सकाळी ८ ते रात्री १० या वेळात होईल. स्पर्धेसाठी रोख, तसेच आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे अंतिम सामने ३ फेब्रुवारी रोजी होतील व त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल. स्पर्धेसाठी हेमंत खाडिलकर हे प्रमुख पंच म्हणून काम पहात आहेत.