पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिल्या लढतीत निखिल नाईक नाबाद ४१)याने केलेल्या झंझावती खेळीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ७ धावांनी पराभव करत दिमाखात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी जेट्स संघाने ६ विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत ४ एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकात ४बाद १७८धावा केल्या. रत्नागिरी संघाने आपल्या सलामी जोडीत पहिल्यांदा बदल केला आणि तो फारसा यशस्वी ठरला. धीरज फटांगरे व अझीम काझी या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ५७ भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. धीरजने २२चेंडूत ३चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ३८धावा केल्या.धीरजला रोशन वाघसरेने झेल बाद त्याचा अडसर दुर केला. फिरकीपटू रोहन खरातच्या गोलंदाजीवर पाठोपाठ अझीम काझी त्रिफळा बाद झाला. त्यानंतर किरण चोरमले व प्रीतम पाटील यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३४चेंडूत ५१ धावा करून धावगती वाढवली. किरण चोरमलेने २२चेंडूत ३८ धावांची खेळी केली. त्यात त्याने २चौकार व ३ षटकार खेचले. प्रीतम पाटीलने २२ धावा काढून किरणला साथ दिली. हे दोघेही बाद झाल्यावर निखिल नाईकने आक्रमक फलंदाजी करताना १९चेंडूत नाबाद ४१ धावा चोपल्या. त्याने २चौकार व ४उत्तुंग षटकार खेचले. निखिलने दिव्यांग हिंगणेकरच्या समवेत पाचव्या विकेटसाठी ८ चेंडूत २४ धावाची भागीदारी करून संघाला १७८धावांचे लक्ष्य उभारून दिले.
या आव्हानाचा पाठलाग ४एस पुणेरी बाप्पा संघाला २० षटकात ९बाद १७२धावाच करता आल्या. पुणेरी बाप्पा संघाची डावाची सुरुवात फारशी चांगली झालीनाही. पवन शहा(१३), रामकृष्ण घोष(१७), यश क्षीरसागर(१७), रोहन दामले(१), अभिमन्यू जाधव(१०) हे लवकर बाद झाले. त्यामुळे पुणेरी बाप्पा संघ १०. १ षटकात ५बाद ६२अशा स्थितीत होता. त्यानंतर सुरज शिंदेने एकाबाजूने आक्रमक खेळी करत २४चेंडूत ५५ धावा काढून धावफलक हलता ठेवला. सूरजने २चौकार व ५षटकारांची आतषबाजी केली. रत्नागिरीचा फिरकीपटू योगेश चव्हाणच्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात ६चेंडूत ३०धावा चोपल्या. त्यात त्याने ४षटकार, २ दुहेरी धावा व १ चौकार ठोकून संघाचे आव्हान आणखी जवळ आणले. सूरज शिंदे व साहिल औताडे(१६धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी १७चेंडूत ४८ धावाची भागीदारी केली. पण ही भागीदारी दिव्यांग हिंगणेकरने सूरजला त्रिफळा बाद करून संपुष्टात आणली व सामन्यातील रोमांच वाढवला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड नाबाद २३, रामकृष्ण घोष १७ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुणेरी बाप्पा संघाला शेवटच्या सहा चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. टेनिस बॉल जगतातील नावाजलेला खेळाडू विजय पावलेने सुरेख गोलंदाजी करून रत्नागिरी जेट्स संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला. त्याने या षटकात १ बळी व ३ धावा देत संघाचा विजय साकार केला. रत्नागिरी जेट्सकडून सत्यजीत बच्छाव(२-१८), साहिल छुरी(२-१३), दिव्यांग हिंगणेकर(२-३२), योगेश चव्हाण(१-४२) यांनी अचूक गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स: २० षटकात ४बाद १७८धावा(धीरज फटांगरे ३८(२२,३x४,३x६), किरण चोरमले ३८(२२,२x४,३x६), निखिल नाईक नाबाद ४१(१९,२x४,४x६),प्रीतम पाटील २२, अझीम काझी १९, रामकृष्ण घोष २-३६, रोशन वाघसरे १-२८, रोहन खरात १-३०) पराभुत वि.४एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ९बाद १७२धावा(सुरज शिंदे ५५(२४,२x४,५x६), ऋतुराज गायकवाड नाबाद २३, रामकृष्ण घोष १७, यश क्षीरसागर १७, साहिल औताडे १६, पवन शहा १३, सत्यजीत बच्छाव २-१८, साहिल छुरी २-१३, दिव्यांग हिंगणेकर २-३२, योगेश चव्हाण १-४२);सामनावीर – निखिल नाईक