पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2024 स्पर्धेचे गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानात दिमाखात उद्घाटन झाले.
“एमपीएल २०२४ साठी प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. एमपीएल २०२३ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभला, तसाच प्रतिसाद यावर्षीदेखील मिळेल, असा मला विश्वास आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणखी गुणवान खेळाडू मिळतील याची अपेक्षा आहे,” असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए)चे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ची सुरुवात गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झाली. उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध गायक संजू राठोड यांनी आपले गाजलेले ‘गुलाबी साडी’ हे गाणे सादर केले. त्याचबरोबर अभिनेत्री मौनी रॉय यांनी केसरिया तेरा… गली गली.. या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इल्युमिनाटी डान्स ग्रुपने आपले नृत्य कौशल्य सादर केले.
उद्घाटन प्रसंगी एमसीएचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, एमसीएचे माजी सचिव रियाज बागवान, मानद सचिव ऍड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय एमसीए ऍपेक्स पदाधिकारी कल्पना तापीकर, शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, विनायक द्रविड, केशव वझे, राजू काणे, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, अजय देशमुख व एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व रत्नागिरी जेट्स यांच्यात रंगला. ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्स, रायगड रॉयल्स, पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, पुनीत बालन ग्रुप(पीबीजी) कोल्हापूर टस्कर्स हे सहा संघ साखळी पद्धतीने एकमेकांशी झुंजणार आहेत 22 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
या स्पर्धेला असंख्य पुणेकरांकडून भरघोस प्रतिसाद लाभला होता. नवोदित खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आता येत्या 22 जूनपर्यंत अत्यंत चुरशीच्या सामन्यांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. तसेच शहरातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली आहे