पुणे: भारतीय रोलबॉल महासंघ आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने आपला धडाका कायम राखून अंतिम फेरीत धडक मारली. आता महाराष्ट्राची विजेतेपदासाठी राजस्थानविरुद्ध लढत होईल.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने तमिळनाडू संघावर ६-४ असा विजय मिळवला.
मेहेक राऊतने पुन्हा एकदा संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मेहेकने (१, ३, ५, ८, ११ मि.) पाच गोल नोंदविले, तर तन्वी यारगट्टीकरने (९ मि.) एक गोल केला. तामिळनाडूच्या महती एम. के. (४, १४, १६, २० मि.) हिची लढत एकाकी ठरली.
दुसºया उपांत्य फेरीतील लढतीत राजस्थान संघाने उत्तर प्रदेश संघावर ४-१ने विजय मिळवला. राजस्थानकडून प्रीतीकाने (४, ५ मि.) दोन, तर जहानूल (९ मि.) आणि एल. शर्माने (११ मि.) प्रत्येकी एक गोल केला. उत्तर प्रदेश संघाकडून आयुषीने (२ मि.) एकमेव गोल केला.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर ९-३ ने मात केली. महाराष्ट्राकडून मेहेक राऊतने (२, ३, ११, १५, १६ मि.) पाच गोल नोंदविले, तर अवनी जोशीने (१३, १७, २० मि.) तीन, तर तन्वी यारगट्टीकरने (१४ मि.) एक गोल करून तिला चांगली साथ दिली.
मध्य प्रदेशकडून आशीने दोन, तर शेरीनने एक गोल नोंदविला. इतर लढतींत तामिळनाडूने हरियाणावर २-१ने मात केली. ही लढत अखेरपर्यंत चुरशीची झाली. तमिळनाडूकडून प्रियदर्शिनीने दोन गोल केले. मध्यंतराला लढत १-१ अशी बरोबरीत होती. उत्तरार्धात बाराव्या मिनिटाला प्रियदर्शिनीने गोल करून तामिळनाडू संघाला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशने गुजरातवर ८-१ अशी, तर राजस्थानने पाँडिचेरीवर ११-१ अशी मात करून उपांत्य फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा पराभव
मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्रावर ५-२ अशी मात केली. आता उत्तर प्रदेशची विजेतेपदासाठी राजस्थानविरुद्ध लढत होईल.
दुसºया उपांत्य लढतीत राजस्थानने गुजरातवर ८-३ ने मात केली. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने गुजरातवर ८-४ असा विजय मिळवला. त्याचबरोबर राजस्थान संघाने मध्य प्रदेश संघावर ८-१ ने, तर गुजरात संघाने लक्षद्वीप संघावर ४-१ने मात केली. यानंतर उत्तर प्रदेशने तमिळनाडूवर ८-२ अशी मात करून उपांत्य फेरी गाठली.