मुंबई | महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक २७ मे रोजी होणार आहे. राज्य संघटनेला संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या तीन सदस्यांपैकी १४ जणांची कार्यकारिणीवर निवड होणार आहे.
तसेच याच जिल्हांतुन येणाऱ्या सदस्यांना निवडणूक लढवण्याचे तसेच मतदान करण्याचे अधिकार आहेत.
जिल्हानिहाय तीन सदस्यांची नावे पाठवण्याची शेवटची तारीख १०मे असुन बहुतेक जिल्ह्यांनी ती पाठवली आहेत.
११ मे रोजी या जिल्हानिहाय मतदारांची यादी जाहीर होणार असुन १२ ते १५ मे दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जातील.
१६ मे रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन वैध उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.
१७ अाणि १८ मे रोजी उमेदवार अर्ज माघारी घेऊ शकतात तर २७ मे रोजी सकाळी मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होईल.
उपाध्यक्ष आणि संयुक्त कार्यवाह अशी दोन पदे महिलांकरिता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य संघटनेने २५फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेतला आहे.
वाचा- पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनमधून राज्य संघटनेवर कोण तिघे जाणार?
२०१३मध्ये कबड्डी असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिलला झाली होती. तेव्हा कार्यकारिणीतील १४ प्रमुख पदांसाठी ३७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले.
माजी केंद्रियमंत्री शरद पवार आणि नंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियमितपणे सहभाग असलेली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची २०१३ची निवडणूक प्रथमच त्यांच्या थेट सहभागाशिवाय झाली होती.
निवडणुकीपूर्वी तत्कालिन अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा राजीनामा दिल्यानंतर ते कबड्डीपासून काहीप्रमाणात दूर झाले आहेत.
सध्या शरद पवार संघटनेचे आजीव अध्यक्ष अध्यक्ष असुन अजित पवार हे प्रमुख आश्रयदाते आहेत.
कार्यकारिणीतील १४ प्रमुख पदे अशी-
अध्यक्ष
कार्याध्यक्ष
उपाध्यक्ष (५ पदे)
सर कार्यवाह
खजिनदार
सहकार्यवाह (५ पदे )
२०१८ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीचा असा आहे कार्यक्रम-
११ मे- जिल्हानिहाय मतदारांची यादी जाहीर
१२ ते १५ मे- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख
१६ मे – उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन वैध उमेद्वारांच्या नावाची घोषणा
१७ अाणि १८ मे- अर्ज माघारी घेण्याची तारीख
२७ मे – सकाळी मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर