येत्या ३० ऑक्टेबर ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान गोव्यात खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांचे नेतृत्व आशियाई स्पर्धेतील मिश्र दुहेरीची सुवर्णविजेती ऋतुजा भोसले व आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन कढे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मडगाव येथील फातोर्डा टेनिस संकुलात टेनिसच्या स्पर्धा होणार आहेत.
महाराष्ट्राच्या संघांमध्ये गुणवान युवा खेळाडू व अनुभव यांचे मिश्रण असून भविष्यात दर्जेदार संघबांधणी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून हे संघ निवडण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
गुजरात येथे झालेल्या गेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी सर्वाधिक पदके जिंकली होती. त्या स्पर्धेत महाराष्ट्राने तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण सात पदके जिंकल्याचे सांगून अय्यर म्हणाले, की यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचे टेनिसपटू सर्व सातही विभागात सहभागी होत आहेत. त्यामध्ये पुरुष व महिला सांघिक स्पर्धा, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी स्पर्धा, तसेच मित्र दुहेरी विभागाचा समावेश आहे.
अर्जुन कढे याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या बलाढ्य पुरुष टेनिस संघात डेव्हिस चषक स्पर्धेचा अनुभव असलेल्या पूरव राजासह अथर्व शर्मा, सिद्धांत बांठिया व अनुप बंगार्गी यांचा समावेश आहे. तर ऋतुजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिला संघात माजी ऑलिम्पिकपटू व दुहेरी विशेषज्ञ प्रार्थना ठोंबरेसह ब्रिक्स स्पर्धेतील कांस्यविजेती वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तुरे व वासंती शिंदे या खेळाडूंचा समावेश आहे.
पुण्याच्या अन्वित बेंद्रे यांची पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी, तर पुण्याच्याच केदार शहा यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे हिमांशू गोसावी दोन्ही संघांचे व्यवस्थापक असतील, तर ऋतुजा कुलकर्णी फिजिओथेरपिस्ट म्हणून संघासोबत राहतील. (Maharashtra tennis team announced for Goa National Games, led by Asian gold medalists Rituja and Arjun)
महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे :
पुरुष संघ – अर्जुन कढे, पूरव राजा, अथर्व शर्मा, सिद्धांत बांठिया व अनुप बंगार्गी, प्रशिक्षक – अन्वित बेंद्रे (पुणे).
महिला संघ – ऋतुजा भोसले, प्रार्थना ठोंबरे, वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तुरे व वासंती शिंदे,
प्रशिक्षक – केदार शहा (पुणे).
व्यवस्थापक – हिमांशू गोसावी (पुणे).
फिजिओथेरपिस्ट – ऋतुजा कुलकर्णी (पुणे)
महत्वाच्या बातम्या –
नजर हटी दुर्घटना घटी! मेंडिसच्या साधलेल्या संधीचे सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडिओ
‘मी स्वत:ला त्यांच्या…’, रोहित शर्माने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य