मापुसा (गोवा), २५ जानेवारी २०२४: मानव ठक्कर आणि मानुष शाह या युवा भारतीय जोडीने गुरुवारी मापुसा, गोव्यातील पेडेम इनडोअर स्टेडियमवर World Table Tennis Star Contender Goa 2024 च्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या पॅंग येव एन कोएन आणि अवतार क्वेक इझाक यांच्यावर आरामात विजय मिळवला.
गुजरातच्या भारतीय जोडीने जल्लोष करणाऱ्या प्रेक्षकांसमोर उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियन प्रतिस्पर्ध्यांवर ११-७, ११-९, ११-५ असा वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. दरम्यान, महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचा आणि सायली वाणी यांनी महिला दुहेरीच्या अंतिम आठमध्ये प्रवेश करून भारतीय ताफ्यात आणखी उत्साह आणला. त्यांनी स्वीडनच्या क्रिस्टीना कॉलबर्ग आणि फिलिपा बर्गांड यांचे मजबूत आव्हान ११-९, ९-११, ११-८, ११-७ असे मोडून काढले.
उपांत्यपूर्व फेरीत भारतीय मुलींचा सामना दक्षिण कोरियाच्या जिओन जिहे आणि शिन युबिन यांच्याशी होईल. दक्षिण कोरियाच्या या जोडीने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या बार्बोरा बालाझोवा आणि तातियाना कुकुलकोवा यांचा ११-९, ११-६, ११-३ असा पराभव केला होता. महिला एकेरीत भारताच्या अर्चना कामतने पहिल्या फेरीत स्पेनच्या मारिया झियाओचा ११-७, १३-११, १२-१० असा पराभव करून राऊंड-ऑफ ३२ मध्ये प्रवेश केला.
श्रीजा अकुला हिने महिला एकेरीच्या दुसर्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या कॅमिली लुट्झचा ११-५, ९-११, ११-७, ११-८ असा पराभव करून भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याचे कारण दिले. भारतीय स्टार दुसऱ्या फेरीत इजिप्तच्या हाना गोडाविरुद्ध खेळेल. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या मार्गदर्शनाखाली स्तूपा स्पोर्ट्स अॅनालिटिक्स आणि अल्टिमेट टेबल टेनिस यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष एकेरीत भारताच्या हरमीत देसाईला पहिल्याच फेरीत क्रोएशियाच्या आंद्रेज गॅसीनाकडून ११-१३, ११-९, ९-११, ११-८, ६-११ असा पराभव पत्करावा लागला. दोन अनुभवी स्पर्धकांमधील ही एक रोमांचक लढत होती आणि प्रचंड संघर्षपूर्ण रॅली आणि आक्रमक खेळाने प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवले. दिवसाच्या इतर निकालांमध्ये, पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या जीत चंद्राला स्पेनच्या अल्वारो रॉबल्सकडून ५-११, ८-११, ४-११ असा पराभव पत्करावा लागला.
भारताच्या अजली रोहिल्लाला महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या ली युन्ह्येविरुद्ध ५-११, १०-१२, ३-११ अशी हार मानावी लागली. भारताच्या नित्या मणीला थायलंडच्या ओरवान परानांगकडून १५-१३, ८-११, २-११, ७-११ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. सोनी स्पोर्ट्स २ एसडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन २ एचडी या चॅनेलवर आणि Sony Liv app थेट प्रक्षेपण पाहू शकतात.