नव्या वर्षाचे 8 दिवस झाले आणि या वर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय हॅट्ट्रिक झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात हा पराक्रम झाला. श्रीलंकेच्या महिश तीक्षणा याने न्यूझीलंडमध्ये हॅट्ट्रिक आपल्या नावावर केली. त्याने दोन षटकांत ही कामगिरी करत इतिहास रचला. तीक्षणाच्या या शानदार कामगिरीनंतरही श्रीलंकेने ही मालिका गमावली. न्यूझीलंडने या सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली.
महिश तीक्षणा न्यूझीलंडमध्ये वनडे हॅट्ट्रिक घेणारा श्रीलंकेचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. पावसामुळे हा सामना 37 षटकांचा करण्यात आला होता. डावाच्या 35 व्या आणि 37 व्या षटकात तीक्षणानं हा पराक्रम गाजवला. त्याने 35 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मिचेल सँटनरला घरचा रस्ता दाखवला. त्यानं 15 चेंडूत 20 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्याच चेंडूत तीक्षणानं नाथन स्मिथला बाद करत दुसरी विकेट घेतली.
महिश तीक्षणानं 37व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅट हेन्रीला बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. नुवानिंडू फर्नांडो यानं त्याचा झेल घेतला. तीक्षणाने संपूर्ण सामन्यात 8 षटकं टाकले. यामध्ये त्याने 44 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. त्याने चौथी विकेट मार्क चॅपमेनची घेतली, जो 62 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या होत्या. संघाकडून ओपनिंग करताना रचिन रवींद्रने 63 चेंडूत 79 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच मार्क चॅपमेनने 52 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमेन यांच्यात शतकी भागीदारी झाली.
वनडे करियरमध्ये चॅपमेनचं हे तिसरं अर्धशतक होतं. तर रवींद्रने चौथं अर्धशतक झळकावलं. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कामिंदू मेंडिस यानं 64 धावा केल्या. परंतु श्रीलंकेची टीम 30.2 षटकात केवळ 142 धावाच करु शकली.
हेही वाचा –
वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या मार्टिन गुप्टिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
रोहित-विराटचा गेलेला फॉर्म कसा परत येईल? रवी शास्त्रींनी सांगितला रामबाण उपाय
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून केएल राहुलचा पत्ता कट होणार? या दिग्गज खेळाडूचं स्थानही धोक्यात