Loading...

महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस संघाचा ‘शिवनेरी’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत काल (६ ऑक्टोबर) विशेष व्यावसायिक गटाचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, भारत पेट्रोलियम व एयर इंडिया यासंघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध युनियन बँक यांच्यात चांगली लढत झाली. मध्यंतरापर्यत युनियन बँककडे २०-१६ अशी आघाडी होती. पण त्यानंतर महिंद्राने जोरदार खेळ करत सामना फिरवला. ओमकार जाधव, अमोल वडार, स्वप्नील शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ करत महिंद्राला ३८-३२ असा विजय मिळवून दिला.
महाराष्ट्र पोलीस विरुद्ध बँक ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या लढतीत महाराष्ट्र पोलीस संघाने ३१-१६ अशी बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुलतान डांगे, बिपिन थले, बाजीराव होडगे यांनी चांगला खेळ केला.
भारत पेट्रोलियमने मुंबई बंदर संघाचा ३५-२५ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सोमवारी भारत पेट्रोलियम विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा तसेच महाराष्ट्र पोलीस विरुद्ध एयर इंडिया अश्या उपांत्य फेरीच्या लढती होतील.
महाविद्यालयीन गटात महर्षी दयानंद महाविद्यालयाने डॉ. आंबेडकर कॉलेजवर ४२-१७ असा एकहाती विजय मिळवला. तर जी. नाईक कॉलेज विरुद्ध वंदे मातरम कॉलेजने २८-१२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्यावसायिक अ श्रेणी गटात टी बी एमने ४०-०७ असा सचिवालय जिमखाना संघाचा पराभव केला तर शिवम एंटरप्राइजने ३५-२२ असा चिनू स्पोर्ट्स वर विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.
Loading...
You might also like