स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत महिंद्रा अँड महिंद्रा संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांत महिंद्रा संघाने मुंबई बंदर संघाचा पराभव केला. स्पर्धेतील सर्वात्कृष्ट खेळाडु म्हणून महिंद्राच्या अजिंक्य पवारला गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेत काळ झालेल्या अंतिम सामन्यांत ४५ -३२ असा महिंद्रा संघाने मुंबई बंदरवर विजय मिळवला. मध्यांतरपर्यत २३-११ अशी भक्कम आघाडी महिंद्राकडे होती.
उत्तरार्धातही ही आघाडी कायम ठेवत महिंद्राने विजय संपादन केला. विजेत्या महिंद्रा अँड महिंद्रा संघाला १,११,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या मुंबई बंदर संघाला ७५,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्वात्कृष्ट खेळाडु म्हणून महिंद्रा अँड महिंद्राच्या अजिंक्य पवारला ११,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून इनकम टॅक्सच्या निलेश साळुंखे तर उत्कृष्ट पकडपटू म्हणून भारत पेट्रोलियमच्या निलेश शिंदेला गौरविण्यात आले. तसेच भारत पेट्रोलियम संघाला स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून सन्मानित करण्यात आले. उपांत्य फेरीत महिंद्रा अँड महिंद्रा संघाने आयएसपील युवा पलटण ३६-३२ असा विजय मिळवला होता. मुंबई बंदर संघाने ५०-४४ असा इनकम टॅक्सवर विजय मिळवला होता.
संक्षिप्त निकाल:
विजेते- महिंद्रा अँड महिंद्रा
उपविजेते- मुंबई बंदर
तिसरा क्रमांक- आयएसपील युवा पलटण
चौथा क्रमांक- इनकम टॅक्स
उत्कृष्ट चढाईपटू- निलेश साळुंखे (इनकम टॅक्स)
उत्कृष्ट पकडपटू- निलेश शिंदे (भारत पेट्रोलियम)
सर्वोत्कृष्ट खेळाडु- अजिंक्य पवार (महिंद्रा)