ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पेरी (Allis perry) हिने डब्ल्यूपीएल (WPL 2026) च्या आगामी हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. तिच्यासोबतच ॲनाबेल सदरलँड हिने देखील वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिग्गज खेळाडूंच्या माघारीमुळे त्यांच्या संघांना मोठा फटका बसला आहे.
आरसीबीने (RCB) एलिस पेरीच्या जागी सयाली सतघरे हिला संघात स्थान दिले आहे. तिला 30 लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. तर, दिल्लीने सदरलँडच्या जागी ऑस्ट्रेलियाची लेग-स्पिनर एलेना किंग हिला करारबद्ध केले आहे. तिला 60 लाख रुपये मिळणार आहेत.
एलिस पेरी ही आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तिने 64.80 च्या सरासरीने 972 धावा केल्या आहेत आणि 14 विकेट्सही घेतल्या आहेत. 2024 मध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात तिचा मोठा वाटा होता. याचबरोबर सदरलँडने गेल्या हंगामात दिल्लीसाठी 9 विकेट्स घेतल्या होत्या. ती सध्याच्या काळातील एक उदयोन्मुख स्टार खेळाडू मानली जाते.
यूपी वॉरियर्सची वेगवान गोलंदाज तारा नोरिस हिची 2026 च्या महिला टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरसाठी अमेरिकेच्या (USA) संघात निवड झाली आहे. हे सामने 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान नेपाळमध्ये होणार आहेत. त्यामुळे तिच्या जागी यूपीच्या संघात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू चार्ली नॉट हिचा समावेश करण्यात आला आहे.






