पुरुष संघांची आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा 2027 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेला सुरू होण्यास एका वर्षांपेक्षा अधिक कालावधी असला, तरी आयसीसीची तयारी सुरू आहे. आता या स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हे सामने फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवले जाणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेचा फॉरमॅट आधीच जाहीर केला आहे.
क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, पात्रता सामने 22 फेब्रुवारी ते 23 मार्च, 2027 या कालावधीत खेळवले जाणार आहेत. यानंतर विश्वचषकामध्ये कोण खेळणार हे संघ निश्चित होतील. अद्याप मुख्य स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी, ही स्पर्धा 4 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान पार पडण्याचा अंदाज आहे.
या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे करणार आहेत. हे सामने एकूण 12 स्टेडियममध्ये खेळवले जातील.
पात्रतेचे स्वरूप
आयसीसीने जाहीर केलेल्या सुधारित फॉरमॅटनुसार, 10 संघांच्या पात्रता फेरीतील विजेत्याला 14 संघांच्या प्रमुख स्पर्धेच्या मुख्य गटात थेट प्रवेश मिळेल. तसेच पात्रता फेरीत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेले संघ विश्वचषकाच्या पहिल्या फेऱीत म्हणजेच सुपर सीरीजमध्ये खेळतील आणि त्यातील अव्वल संघ सुपर 12 संघांच्या मुख्य टप्प्यासाठी पात्र ठरतील.
10 संघांच्या पात्रता फेरीत कोण खेळणार?
आयसीसीने ठरवले आहे की, 30 सप्टेंबर 2026 रोजीच्या आयसीसी क्रमवारीत जे संघ अव्वल आठमध्ये असतील ते थेट पात्र. तळाच्या दोन संघांना मात्र पात्रता फेरीत खेळावे लागेल.
दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. याचा अर्थ क्रमवारीतील तळाचे दोन संघ, क्रिकेट विश्वचषक लीग 2 गुणतालिकेतील अव्वल चार संघ आणि विश्वचषक पात्रता फेरीतील चार संघ असे एकूण दहा संघ असतील. (Major update on the ICC ODI World Cup 2027; Qualifier round dates revealed)






