साहल अब्दुल समदने नवखा खेळाडू ते स्टार अशी वाटताल केली असून ती फार प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण ठरली आहे. केरला ब्लास्टर्स एफसीकडून राखीव संघातून त्याने सुरुवात केली.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये जन्मलेल्या साहलने मग मध्यरक्षक म्हणून नाव कमावले. त्यामुळे त्याला अव्वल संघात संधी मिळाली. हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) 2017-18 मध्ये छोट्या छोट्या संधी मिळाल्यानंतर त्याने प्रभाव पाडला. त्यामुळे तेव्हाचे मुख्य प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी 2018-19 मध्ये त्याला स्टार्टींग लाईन अपमध्ये संधी दिली. तेव्हापासून साहलने मागे वळून पाहिलेले नाही.
ब्लास्टर्सकरीता मागील मोसम निराशाजनक ठरला, पण 22 वर्षीय साहल केवळ एका सामन्यास मुकला. मध्यफळीचा आधारस्तंभ म्हणून त्याने मारलेली मजल सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. सर्वत्र मिळालेल्या या प्रसिद्धीनंतरही आपले पाय जमिनीवरच राहावेत म्हणून तो प्रयत्नशील आहे.
साहलने सांगितले की, खेळतो त्या प्रत्येक सामन्याचा आनंद लुटायचा इतकाच माझा प्रयत्न आहे. प्रत्येक फुटबॉलपटूला अशा दडपणातून जावे लागते. मी इतकाच प्रयत्न करतो आहे की माझ्या खेळावर परिणाम होता कामा नये.
साहलची शैली आणि चेंडूवर ताबा असतानाचे तंत्र राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांच्यासाठी लक्षवेधी ठरले. मग लवकरच तो भारतीय संघाचा भाग बनला. थायलंडमधील किंग्ज कपमध्ये त्याने भाग घेतला. 2019च्या फिफा विश्वकरंडक पात्रता फेरीत ओमान आणि कतार यांच्याविरुद्ध खेळलेल्या संघात तो मध्य फळीचा भाग होता. उल्लेखनीय बाब म्हणजे आशियाई विजेत्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखण्याच्या कामगिरीत त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
साहलने सांगितले की, भारतासाठी खेळणे नक्कीच अनोखे आहे. देशाचे प्रतिनिधीत्व करणे हे कोणत्याही तरुण खेळाडूचे स्वप्न असते. माझ्या बाबतीत सुद्धा हे घडले व माझे स्वप्न साकार झाले.
साहल आता सहाव्या हिरो आयएसलची तयारी करतो आहे. 20 ऑक्टोबर रोजी कोचीमध्ये केरळा ब्लास्टर्स आणि एटीके यांच्यात सलामीची लढत होईल. एल्को शात्तोरी यांच्या संघातील मोलाचा खेळाडू म्हणून आपण मोसमाला प्रारंभ करीत आहोत याची साहलला जाणीव आहे. हा मध्यरक्षक अवास्तव दडपणाला बळी पडत नसला तरी पहिल्या पाच वर्षांत दोन वेळा हुलकावणी दिलेले जेतेपद जिंकण्याचे ध्येय ब्लास्टर्सने ठेवले पाहिजे असे त्याला वाटते.
साहल म्हणाला की, केरळा ब्लास्टर्स एफसी माझे दुसरे घर आहे. आता माझ्याकडे जे काही आहे त्याचे श्रेय ब्लास्टर्सचा संघ आणि प्रशिक्षण दलाला जाते. मी केलेली प्रगती आणि अव्वल संघाशी एकरूप होण्यात प्रशिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
त्याने पुढे सांगितले की, फुटबॉल हा खेळ सांघिक आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा असतो. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी सुद्धा कोणतीही गोष्ट वेगळी नाही. संघाची जर्सी घातल्यावर आम्हाला सुद्धा दडपण जाणवते. ब्लास्टर्सच्या लाखो चाहत्यांसाठी खेळायला मिळणे हे माझे भाग्य आहे. तुमच्या कामगिरीला महत्त्व दिले जाणे ही फार मोठी गोष्ट असते. प्रत्येक फुटबॉल क्लब सर्वोच्च करंडकाचे ध्येय ठेवून खेळतो. आमच्यासाठी सुद्धा असेच आहे. आम्हाला हिरो आयएसएल जिंकायची आहे.