अँटिग्वा। वेस्ट इंडिजमध्ये नुकतीच चौदावी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या विजेतेपदाचं मुकूट यश धूलच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाच्या डोक्यावर चढलं. शनिवारी (५ फेब्रुवारी) भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करत विक्रमी पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले. भारताने जरी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले असले, तरी या संपूर्ण स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक लक्ष वेधले असेल, तर तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिस याने. या विश्वचषकातील मालिकावीराचा पुरस्कारही त्यालाच देण्यात आला.
ब्रेव्हिसने जिंकला मालिकावीर
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक ब्रेव्हिसने आपल्या ताबडतोड फलंदाजीने चांगलाच गाजवला. ‘बेबी एबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेव्हिसने दक्षिण आफ्रिकेकडून या विश्वचषकात ६ सामन्यांत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या. यात त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या सामन्यात १३० चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १३८ धावांची शतकी खेळी केली होती. याशिवाय त्याने या स्पर्धेत ७ विकेट्सही घेतल्या.
त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला २०२२ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आणि मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
तो १९ वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१० साली डॉमिनिक हेंड्रिक्स आणि २०१४ साली एडेन मार्करम या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी १९ वर्षांखालील विश्वचषकातील मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.
याबरोबरच हे देखील माहित करून घेणे महत्त्वाचे आहे की, १९ वर्षांखालील विश्वचषक १९८८ सालापासून खेळवला जात असला, तरी मालिकावीर पुरस्कार २००० सालापासून दिला जातो. त्यामुळे ब्रेव्हिस मालिकावीर पुरस्कार जिंकणारा एकूण १२ वा खेळाडू आहे.
🏏 506 runs at 84.33
☝ 7 wickets at 28.57South Africa's Dewald Brevis is the ICC Under 19 Men's Cricket World Cup Player of the Tournament 👏#U19CWC pic.twitter.com/RlOzrtES39
— ICC (@ICC) February 5, 2022
ब्रेव्हिसने मोडला शिखरचा १८ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम
ब्रेव्हिसने या विश्वचषकात ५०६ धावा केल्या असल्याने तो एका १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम भारताच्या शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नावावर होता. शिखरने २००४ साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ७ सामन्यांत ८४.१६ च्या सरासरीने ३ शतके आणि १ अर्धशतकासह ५०५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यालाही मालिकावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
१९ वर्षांखालील मालिकावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू
२००० – युवराज सिंग (भारत)
२००२ – तातेंदा तायबू (झिम्बाब्वे)
२००४ – शिखर धवन (भारत)
२००६ – चेतेश्वर पुजारा (भारत)
२००८ – टीम साऊथी (न्यूझीलंड)
२०१० – डॉमिनिक हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका)
२०१२ – विल बोसिस्तो (ऑस्ट्रेलिया)
२०१४ – एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका)
२०१६ – मेहदी हसन (बांगलादेश)
२०१८ – शुबमन गिल (भारत)
२०२० – यशस्वी जैयस्वाल (भारत)
२०२२ – डेवाल्स ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका)
महत्त्वाच्या बातम्या –
VIDEO: रिव्ह्यू घेण्यातही कॅप्टन रोहित हिट! चलाखीने दाखवला ब्रावोला तंबूचा रस्ता
‘लेगस्पिन ग्रँडमास्टर’ चहलने घातली नव्या विक्रमाला गवसणी