भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव केला. प्रथम खेळताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य १७.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमधून वारंवार वगळल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. व्यवस्थापनाकडून ह्या खूप मोठ्या चुका होत आहेत, असे ते म्हणाले आहेत. मदन लाल यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटले की, ‘भारताने न्यूझीलंडविरुद्ध दोन टी२० सामने जिंकले याचा मला आनंद आहे. पण, मी हेही म्हणेन की युजवेंद्र चहलला सामन्यात न खेळवून ते एक मोठी चूक करत आहेत.” ते पुढे म्हणाले, ‘रविचंद्रन अश्विन खूप चांगली कामगिरी करत आहे. कारण, त्याला संधी उपलब्ध होत आहेत. मला वाटतं चहल हा देखील खूप प्रतिभावान गोलंदाज आहे आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी त्याला काही सामन्यांमध्ये संधी देण्याची गरज आहे. तो चांगली गोलंदाजी करत आला आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाचा तो एक महत्त्वाचा भाग राहिला आहे.’
न्यूझीलंडने आयसीसी टी२० विश्वचषकाच्या तुलनेत भारतीय संघाविरुद्ध कशी कामगिरी केली? असे विचारले असता, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य असलेल्या लाल यांनी म्हटले की, ‘न्यूझीलंड संघ इतके दिवस विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये होता आणि लगेचच ते भारतात आले. मला वाटते की, ही मालिका त्यांच्यासाठी चांगली राहिली नाही कारण न्यूझीलंड संघ थकला आहे.’
लाल पुढे म्हणाले, ‘पण ते हरत असले तरी ते खूप काही शिकत आहेत. ते भारतीय परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. त्यांच्या युवा क्रिकेटपटूंना संधी देत आहेत.’