मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर आणि अर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा मुख्य खेळाडू सिर्जिओ अग्वारो याच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी सिर्जिओ अग्वारो याच्या बरगड्याला इजा झाली आहे. दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, परंतु अंदाजे दोन महिने सिर्जिओ अग्वारो मैदानाबाहेर असू शकतो.
सिर्जिओ अग्वारो काल कोलंबियन स्टार मालूना याच्या कॉन्सर्टसाठी ऍमस्टरडॅम येथे गेला होता. हा कार्यक्रम संपवून तो एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी घेतली. या टॅक्सी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामुळे टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जाऊन आदळली. टॅक्सीतील एअर बॅग्ज मुळे या अपघातात जीवितहानी झाली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सिर्जिओ अग्वारो सहा ते आठ आठवडे फ़ुटबाँल खेळाला मुकणार आहे. त्यामुळे तो शनिवारी होणाऱ्या प्रीमियर लीगमधील चेल्सी विरुद्धच्या महत्वाच्या सामन्याला मुकणार आहे. त्याचबरोबर अर्जेन्टिना संघाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विश्वचषक पात्रताफेरी साठी होणाऱ्या पुढील दोन सामन्याला देखील तो मुकणार आहे.
अग्वारो याने त्याच्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात इंडिपेंडिएंटे या अर्जेन्टिना मधील क्लबकडून केली होती. या क्लबने अग्वारोला ट्वीट करताना लवकर बरा होण्यास्तही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या काळात त्याच्या पाठीशी सर्व इंडिपेंडिएंटेचा परिवार असल्याचे म्हटले आहे.