काल प्रिमियर लीगच्या १८ व्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे सामने पार पडले. अर्सेनल, चेल्सी, मॅन्चेस्टर सिटी, टोट्टेन्हम हाॅटस्पर्स, बर्नले, आणि लिचेस्टर सिटी अश्या प्रमुख संघांचे सामने झाले.
उर्वरित सामने आज दुसऱ्या दिवशी होतील. त्यात मॅन्चेस्टर युनाएटेड, लिवरपूल, एवरटाॅन या संघांचे सामने आहेत. लीग मध्ये ५२ गुणांसह मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे तर युनाएटेड ३९ गुणांसह दुसऱ्या स्थानी.
गुणतालिकेत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रिस्टल पॅलेसने ८ व्या स्थानावर असलेल्या लिचेस्टर सिटीचा ०-३ ने पराभव केला.
अर्सेनलने न्यू कॅसेल विरुद्ध १-० ने विजय नोंदवला २३ व्या मिनिटला ॲलेक्स सॅन्चेझचा गोलचा प्रयत्न थांबवला पण पेन्लटी बाॅक्स जवळ असलेल्या ओझीलने डाव्या पायाने आलेला बाॅल मारत सामन्यातला एकमेव गोल करत अर्सेनलला विजय मिळवून दिला.
चेल्सीने साऊथ्यॅम्पटनचा १-० ने पराभव केला. पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत मिळालेल्या फ्री किकवर चेल्सीचा डिफेंडर मार्कोस अलाॅन्सोने गोल करत १-० अशी अजेय बढत मिळवून दिली. मार्कोस अलाॅन्सोने त्याच्या चेल्सीमधील पदार्पणानंतर प्रिमियर लीगच्या डिफेंडर्स मध्ये सर्वाधिक १० गोल्स आणि ४ असिस्ट नोंदवले आहेत. कालचा शेवटचा सामना अटीतटीचा होईल म्हणून सर्वांचे त्याकडे लक्ष होते पण मॅन्चेस्टर सिटीने ४-१ ने टोट्टेन्हम हाॅटस्पर्सचा धुव्वा उडवत सामना एकतर्फी केला.
सिटीने १४व्या मिनिटालाच पहिला गोल करत १-० ने बढत मिळवली. तिथून पुढे पहिला हाफ सिटीला थांबवण्यात स्पर्सचा खेळाडूंना यश मिळाले. सामना शेवटच्या २० मिनिटात पोहचला असताना ७०व्या मिनिटला काऊंटर अटॅक करत सिटी तर्फे डी ब्रुनेने गोल करत बढत २-० अशी केली.
५ मिनिटानंतर मिळालेल्या पेन्लटीचे गोल मध्ये रुपांतर करण्यात गॅब्रियल जिससला अपयश आले. अवघ्या ५ मिनिटानंतर ८० व्या मिनिटला परत एका काऊंटर अटॅक वर सानेच्या असिस्ट वर गोल करत स्टर्लिंगने तिसरा गोल केला. ९० व्या मिनिटला चौथा गोल करत सिटीने ४-० ने आघाडी घेतली. अतिरिक्त वेळेत स्पर्स तर्फे एरिक्सनने एकमेव गोल करत सामन्याचा शेवट स्पर्स साठी समाधानकारक केला.
सिटी तर्फे डीब्रुने ने ८ असिस्ट तर ६ गोल्स केले आहेत. स्टर्लिंग ११ तर ॲगुवारो १० गोल्स करत प्रमियर लीगच्या सर्वाधिक गोल स्कोररच्या यादीत ३ आणि ४ नंबरला आहेत. सिटीने मागील वर्षीच्या पहिल्या ५ संघांविरुद्ध विजय मिळवत १५ गोल्स केले आहेत तर फक्त ३ गोल्स करण्यात प्रतिस्पर्धी संघांना यश आले आहे.