गोल्ड कोस्ट। २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक तर एकूण चौथे पदक मिळाले आहे. आज मनिका बात्राने भारताला २४वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
तिने आज अंतिम सामन्यात सिंगापूरच्या यु मेंग्युला ११-७, ११-६, ११-२, ११-७ अशा ४ गेम्समध्ये पराभूत करून सामना ४-०ने जिंकला आणि सुवर्णपदकालाही गवसणी घातली. याबरोबरच ती टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक असून एकूण तिसरे पदक आहे. याआधी तिने महिला सांघिक स्पर्धेत एकेरीत सामन्यात विजय मिळवत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. तर काल तिने महिला दुहेरीमध्ये मौमा दासच्या साथीने रौप्य पदक मिळवले आहे.
आज भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगलेच चमकले आहेत. आज भारताला एकूण ७ सुवर्णपदके मिळाली आहेत. त्यामुळे आता भारताच्या खात्यात एकूण २४ सुवर्णपदके झाली आहेत.